आपल्या बाळाचे नाव जन्मनोंदणी रजिस्टरमध्ये नोंद करा-बीडीओ जमईवार

0
149

अर्जुनी मोरगाव,दि.१५-बहुतांश पालक आपल्या पाल्यांच्या जन्माची नोंदणी नावाशिवायच करतात. मात्र शासनाच्या सुधारित पत्रकानुसार आपल्या पाल्यांच्या जन्मनोंद वहीत बाळाच्या नावांची नोंद करावी असे आवाहन अर्जुनी मोरगावचे गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांनी केले आहे.
जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ चे कलम १४ व महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी नियम २००० नियम क. १० नुसार जन्मनोंदणीमध्ये जन्म दिनांकापासून १५ वर्षा पर्यंतच्या बाळांच्या नावांची नोंद करण्याची सोय आहे. केंद्र शासनाच्या १३ मे २०१४ च्या आदेशान्वये १५ वर्षानंतर बाळाच्या नावाची नोंद जन्मनोंदणीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ५ वर्ष मुदतवाढ दिलेली आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने १५ मे २०१५ रोजी अधिसूचना निर्गमित केली. त्याद्वारे ५ वर्षासाठी म्हणजे १४ मे २०२० पर्यंत पाच वर्षासाठीच्या कालावधीसाठी १५ वर्षाचा कालावधी शिथिल केला आहे. त्यानुसार १५ मे २०१५ ते १४ मे २०२० पर्यंत जास्तीत-जास्त qकबहुना सर्व नागरिकांनी त्यांचे नाव जन्मनोंदणीमध्ये समाविष्ट करावे. ज्या नागरिकांच्या मुलाच्या जन्माची नावाशिवाय नोंदणी १ जानेवारी २००० पूर्वी झालेली आहे. व ज्यांच्या नोंदणीला १५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अशा सर्व नागरिकांना या संधीचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये सन १९६९ पूर्वीच्या नोंदणीचाही समावेश आहे. संबंधित व्यक्ती अथवा त्यांचे पालक यांच्या बाळाचे नाव समाविष्ट करणेबाबतचा अर्ज घेण्यात यावे, नावाच्या शाबितीकरिता कुठलाही एक शासकीय पुरावा उदा.शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, एस.एस.सी. प्रमाणपत्र, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्डची प्रत घेण्यात यावी. बाळाचे संपूर्ण नाव नोंदविण्याबाबत आग्रह धरण्यात यावा, बाळाचे नाव समाविष्ट झाल्यानंतर ते नाव बदलता येत नाही याची कल्पना नागरिकांना देण्यात यावी व तसा फलक दर्शनीय भागावर लावण्यात यावा, काही धर्मामध्ये आई-वडील यांचे आडनावापेक्षा बाळाचे आडनाव वेगळे ठेवण्याची प्रथा असते. तसेच बाळाचे मधले नाव वडिलाच्या नावापेक्षा वेगळे असते. अशा प्रकरणात संबंधिताकडून अर्जामध्ये तसा उल्लेख नमूद करून घेण्यात यावा. बाळाचे नाव जन्म नोंदणीत समाविष्ट केल्यानंतर शेरा रकान्यात या परिपत्रकाचा संदर्भ, क्रमांक व दिनांक नमूद करून निबंधक/उपनिबंधक जन्म-मृत्यू यांची स्वाक्षरी करून दिनांक नमूद करावा व नावासह सुधारित जन्मदाखला वितरित करण्यात यावा. जन्मनोंदणीत बाळाचे नाव समाविष्ट करण्याबाबतचा अर्ज जन्म अहवालासोबत कायमस्वरूपी जतन करण्यात यावा. तेव्हा सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा कारण १४ मे २०२० या तारखेनंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांनी केले आहे.