तिरोडा,दि.१५– राज्य सरकारने यावर्षीपासून सुरू केलेल्या खासदार दत्तक ग्राम योजनेच्या धर्तीवर आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा संकल्प घेतला आहे. त्यानुसार तिरोडा, गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी तालुक्यातील चिखली गावाची आमदार आदर्श ग्राम योजनेकरिता निवड केली आहे. या गावाच्या विकासासंदर्भात आमदार रहांगडाले यांनी चिखली येथे तालुकास्तरीय अधिकाèयांची आढावा बैठक घेऊन गावाच्या विकासाला सुरुवात केली आहे.
११ सप्टेंबर रोजी चिखली येथे आमदार रहांगडाले यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन गावाला व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. चिखली गावाच्या विकासासाठी आमदार निधी व्यतिरिक्त इतर योजनेतील निधीचा वापर करून गावाला आदर्श व मॉडेल करणार असल्याचे ग्रामसभेत आढावा प्रसंगी बोलताना आ. विजय रहांगडाले म्हणाले. यावेळी पंचायत समिती सभापती, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पं.स. सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामसभेनंतर वृक्षारोपण करण्यात आले.