प्रभावी अंमलबजावणीमुळे आरोग्यविषयक योजनात यश

0
12

ङ्घ संस्थेत प्रसुतीचे प्रमाण ९९ टक्के
ङ्घ १२०५९ गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभ
गोंदिया,दि.१५ : नक्षल प्रभावित, दुर्गम व आदिवासी भागात जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे अनेकांना या योजनांचा लाभ घेता आला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण होण्यास मदत झाली आहे. नऊ वर्षाच्या कालावधीत आरोग्य सेवेत मोठा बदल झाला असून अनेक योजना लोकाभिमुख झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना घेता आला आहे.
सन २००५-२००६ या वर्षात आरोग्य संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण ३९.१८ टक्के, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ७५.०२ टक्के, प्राथमिक लसीकरण- ९५.६५ टक्के, अर्भक मृत्यू दर- ४०.७२ टक्के, प्रजनन दर २.५३ टक्के असा होता. सन २०१४-१५ या वर्षात आरोग्य संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण ९९.६४ टक्के, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया- ९४.७४ टक्के, प्राथमिक लसीकरण- १०० टक्के, अर्भक मृत्यू दर- २४.७२ दरहजारी, प्रजनन दर- २.०५ दरहजारी असा आहे.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मातेला संस्थेत प्रसुती केल्यानंतर ७०० रुपये व शहरी भागातील मातेला ६०० रुपये, मातृत्व अनुदान योजनेअंतर्गत संस्थेतील प्रसुतीनंतर ४०० रुपये. प्रत्येक मातेला प्रसुती काळात ३ दिवस मोफत जेवण, जोखमीच्या मातांना विनामूल्य वाहन व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात आल्यामुळे जवळपास १०० टक्के प्रसुती हया आरोग्य संस्थेत झाल्या आहेत.
सन २०१४-१५ या वर्षात १६५२६ प्रसुती हया संस्थेत झाल्या असून त्यापैकी १३८४० गरोदर मातांना घरापासून संस्थेत मोफत सेवा देण्यात आल्या आहे.
मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गर्भवती मातांची, स्तनदा मातांची आणि ० ते ६ महिने वयोगटातील बालकांची तपासणी करुन १२०५९ गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१४-१५ या वर्षात मानव विकास मिशन अंतर्गत ४५५ आरोग्य शिबीरे घेण्यात आली.
२१ नोव्हेंबर २०१३ पासून जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ६ हजार २४९ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. १ कोटी १५ लक्ष २० हजार रुपये या योजनेअंतर्गत रुग्णांवर खर्च करण्यात आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रात विविध आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम, नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे.