गोंदिया,दि.१५ : दुष्काळ परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सन २०१४-१५ या पहिल्या वर्षात जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील ९४ गावांची निवड करण्यात आली. यामधून मामा तलावांचे खोलीकरण, सिमेंट नाला बांध तयार करणे, भात खाचराची दुरुस्ती करणे तसेच नाला सरळीकरणाची कामे घेण्यात आले.
तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथील नाल्यावर लघु सिंचन (जलसंधारण) विभागाने सिमेंट नाला बांधचे काम जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत केले. सिमेंट नाला बांध बांधण्यात आल्यामुळे नाल्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली. बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांना पाण्याचा वापर धानपिकासाठी करता आला. जवळपास ६ ते ७ हेक्टर क्षेत्रावरील पिकासाठी नाल्याच्या पात्रातील पाण्याचा वापर धानाची रोपाई आणि सिंचनासाठी झाला. जलयुक्त शिवार अभियानातून सिमेंट नाला बांध बांधण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना धान रोपाई व सिंचनासाठी पाण्याचा उपयोग झाला.