शिष्यवृत्ती योजनांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न साकारणार

0
6

गोंदिया,दि.१५ : गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना असंख्य अडचणींना तोंड दयावे लागते. त्यांना अडचणींवर मात करता यावी व सहज शिक्षण घेता यावे या उद्देशाने विद्यार्थ्यांकरीता शासनस्तरावर विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते ७ वीतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आणि ८ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच मागासवर्गीय विद्यार्थीनींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे याकरीता इयत्ता ५ वी ते ७ वीतील विद्यार्थीनींना मासिक ६० रुपये प्रमाणे १० महिन्यांकरीता आणि ८ वी ते १० वी च्या विद्यार्थीनींना मासिक १०० रुपये प्रमाणे १० महिन्यांकरीता १ हजार रुपये वाटप करण्यात येतात. सन २०१४-१५ मध्ये या योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते ७ वीतील अनुसूचित जातीमधील ३ हजार १६८ विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यावर १९ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. इयत्ता ८ वी ते १० वी करीता अनुसूचित जातीतील १ हजार ६०० विद्यार्थीनींनी या योजनेचा लाभ घेतला असून १६ लक्ष रुपये या योजनेवर खर्च करण्यात आला आहे.
शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १० वी आणि वर्ग ११ वी ते पुढे शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. ६८५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. या शिक्षणविषयक योजनांच्या लाभामुळे गरजू व शिक्षणाची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होत आहे.