शैक्षणिक संस्थांनी उद्योजक घडवावे-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

0
7

नागपूर दि. १६- देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योजक घडविण्याची क्षमता आहे. त्यानुसार संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण ज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करावे आणि उद्योजक निर्माण करून देशाची सेवा करावी, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी (ता. 15) येथे केले.

विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) तेराव्या दीक्षान्त समारंभप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, व्हीएनआयटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक डॉ. नरेंद्र चौधरी, कुलसचिव येरपुडे उपस्थित होते.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, आजच्या तारखेत ज्ञानासोबतच कौशल्यालादेखील महत्त्व आहे. त्यामुळे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करताना कौशल्य विकासावरदेखील भर दिला पाहिजे. यातूनच समाज व देशाला प्रगतीच्या शिखरावर नेता येईल. तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे आहे. याचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे.

या कार्यक्रमाला राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा, तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांचा समावेश होता.