आनंदवनाच्या कार्यासाठीच पुरस्कार-डाॅ.आमटे

0
8

नागपूर दि. १६: बाबांनी सुरू केलेल्या आनंदवनातून आतापर्यंत २५ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले पण आजही १६00 रुग्ण येथे आहेत. एखादा पुरस्कार स्वीकारताना बाबांनी सुरू केलेल्या या कार्याचा उष्टा पुरस्कार मी स्वीकारतो आहे, अशी भावना मनात येते. आनंदवनच्या कार्यासाठी मला पुरस्कार मिळतो पण तो माझा एकट्याचा नाहीच. रुग्णांनी स्वेच्छेने स्वीकारलेल्या जेलचा मी जेलर आहे. आनंदवन सारखा प्रकल्प समाजात असणे वाईट आहे. या प्रकल्पाचे काम आता संपायला हवे, असे मत महारोगी सेवा समिती, वरोराचे डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले.
नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा नागभूषण पुरस्कार स्वीकारताना विकास आमटे बोलत होते. बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी. खा. दत्ता मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रासायनिक खते मंत्री हंसराज अहिर, न्या. व्ही. एस. सिरपूरकर, प्रभाकरराव मुंडले, गिरीश गांधी, सत्यनारायण नुवाल, राजेन्द्र पुरोहित, डी. आर. मल, ब्रजकिशोर अग्रवाल, सुरेश शर्मा, मोहन अग्रवाल उपस्थित होते. मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते विकास आमटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
याप्रसंगी हंसराज अहिर म्हणाले, सामाजिक बांधिलकी सांभाळणार्‍या एका संस्कारक्षम व्यक्तीमत्वाला हा पुरस्कार प्रदान करताना मला अभिमान वाटतो. आनंदवनला टायरचे बांध आणि सेंद्रिय शेतीचा उपयोग मी अनुभविला आहे. याच पद्धतीने देशात हा प्रयोग राबविणे गरजेचे असून त्यासाठी माझे मंत्रालय प्रयत्न करीत आहे. आमटेंनी कधीही मागितले नाही, ते काम करीत राहिले. त्यांचे काम यशस्वी व्हावे, अशी शुभेच्छा त्यांनी दिली.गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक तर शुभदा फडणवीस यांनी संचालन केले.