विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार

0
9

भंडारा दि.३०-: शहरातील बजरंग गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीवर शहर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेच्या निषेधार्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारला दुपारी १ वाजता पोलीस ठाण्याला घेराव करुन दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
तत्पूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध केला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बुधवारला भंडारा शहर बंदचे आवाहन केले आहे. यावेळी ते म्हणाले, मंगळवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बजरंग गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघाली. मिरवणूक महालाजवळ आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे संकटमोचक मंदिरात हनुमंताच्या मूर्तीसमोर हनुमान चालिसाचे पठण सुरु असतानाच काही पोलिसांनी तरुणांना धमकविणे सुरु केले.

काही कळायच्या आतच पोलिसांनी कार्यकर्त्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा लाठीमार का केला जात आहे, हे विचारण्यासाठी काही ज्येष्ठ कार्यकर्ते गेले असता त्यांच्यावरही लाठीमार करण्यात आला. कार्यकर्ते जिवाच्या आकांताने जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून पकडून बदडले. या लाठीहल्ल्यात दश माटूरकर, हर्षल कुंभारे, चेतन पाटील, वैभव बांते, हरीष हुकरे, प्रणय कुथे, संकेत मते, शुभम माटूरकर, मिलिंद डुंभरे, बंटी अले, जय पटेल या तरुणांच्या पाठीवर लाठीचे बेदम व्रण आहेत. याशिवाय उषा सरसाळे, सुमन डुंभरे, आरजु करंडे, तुलसी पटेल या महिलांनाही पोलिसांनी बेदम मारहाण केली.