चंद्रपूर २८ मे – चंद्रपूर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाविरुद्ध सुरु केलेल्या कारवाईत आज अनेक भागातील नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले. सवारी बंगला,जटपुरा गेट तसेच तुकूम येथील नाल्यावरील अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात येऊन अतिक्रमण धारकांना पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर अतिक्रमण मुक्त करण्याची कारवाई मागील अनेक दिवसांपासुन सातत्याने करण्यात येत आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत,जटपुरा गेट,त्रिवेणी जिम जवळील नाल्यावर पक्की भिंत उभारून केलेले वॉल कंपाऊंड तोडण्यात आले.त्याचप्रमाणे पत्र्याचे शेड लावुन अतिक्रमित केलेली जागा मोकळी करण्यात आली. इतर नाल्यांवरील उभारलेली दुकाने,पत्र्यांचे शेड,दुकानाच्या पायऱ्या तोडण्यात आल्या आहेत.
येणाऱ्या पावसाळ्यात नाल्यावरील अतिक्रमण हे पाणी तुंबण्याचे कारण ठरू शकत असल्याचे लक्षात घेता मनपातर्फे मान्सुनपुर्व नालेसफाई करण्याबरोबरच नाल्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्यात आला होता. यात गडर लाईन कव्हर करणे,पक्के बांधकाम करणे,व्हरांडा बांधण्यासारखे अतिक्रमण केलेले आढळुन आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण काढण्याच्या नोटीस व वेळ देण्यात आला होता. मात्र ज्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येत आहे.
नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते,याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो झाल्यास परिसरात पाणी शिरून साधन संपत्ती व आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ज्या नागरिक, दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे त्यांनी ते त्वरित काढण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. अन्यथा मनपाकडून सदर अतिक्रमण तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
नाल्यावरील अतिक्रमणावर मनपाद्वारे कारवाई
वाढदिवसाच्या शुभेच्छा