जिल्ह्यात मुबलक लस उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री संदिपान भुमरे

0
19

यवतमाळ, दि. 14 : शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सध्या 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले असून 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने दुसरा डोज देण्यात येणार आहे. जिल्ह्यात दुस-या डोजसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध करणे, हे आपले प्राधान्य आहे, असे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी बैठकीला ऑनलाईन पद्धतीने जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार बाळू धानोरकर, विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा, आमदार सर्वश्री मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाणे, शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी तर मंचावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते.

ग्रामीण भागात अगदी प्राथमिक आरोग्य स्तरावरसुध्दा आयसोलेशन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, संभाव्य परिस्थती लक्षात घेता लहान मुलांच्या बाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्त्री रुग्णालयात नियोजन करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16 नवीन रुग्णवाहिका घेण्याला मंजूरी देण्यात आली असून भविष्यातही 20 नवीन रुग्णवाहिका घेतल्या जातील. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड सेंटर, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आदी ठिकाणी पाणी तसेच स्वच्छतेची व्यवस्था प्राधान्याने करावी. कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला डीसीएचसी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच उपचाराची निश्चित पध्दती काय असावी, यासाठी क्लिनीकल एक्सलन्स कार्यक्रम खालच्या स्तरावर राबविण्यासाठी डॉक्टरांचे वेबीनार घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्‍यांनी सादरीकरणात जिल्ह्यात बेडची व्यवस्था, उपलब्ध ऑक्सीजन साठा, पीएसए प्लाँट, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्धता आदींबाबत माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनीसुध्दा कोविड उपाययोजनेसंदर्भात विविध सुचना केल्या.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्‍हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबेळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे यांच्यासह इतर डॉक्टर्स व अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस गस्ती वाहनांचे हस्तांतरण

आपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरीत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात पोलिस गस्तीकरीता 54 जीप व 95 दुचाकी नव्याने प्राप्त झाल्या असून पोलिस विभागाला त्याचे हस्तांतरण पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. भुमरे यांनी नवीन जीपचे विधीवत पूजन व हिरवी झेंडी दाखवून सदर जीप पोलिस विभागाकडे हस्तांतरीत केल्या. तत्पूर्वी प्रास्ताविकात जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणाले, यापूर्वी पोलिसांच्या मदतीसाठी, अग्निशमन सेवेसाठी तसेच रुग्णवाहिकेसाठी विशिष्ट क्रमांक आहे. त्याच धर्तीवर आता आपत्कालीन मदतीसाठी ‘डायल 112’ हा क्रमांक उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर कोणत्याही नागरिकाने मदतीसाठी कॉल केला तर कोणत्या जिल्ह्यातून फोन आला, याची माहिती राज्याच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यानुसार सदर संदेश संबंधित जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्यावर फोन करणा-या नागरिकाला तात्काळ मदत उपलब्ध करून येईल.

जिल्ह्याला नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत 54 जीम व 95 दुचाकी साठी 6 कोटी 44 लक्ष रुपये जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे. ही वाहने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, सर्व पोलिस ठाणे आदी ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन अशोक कोठारी यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. खांडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार प्रदीप परदेशी, अवधुतवाडी ठाण्याचे ठाणेदार श्री. केदारे, राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे आदी उपस्थित होते.