नगरपंचायतीच्या रणांगणात ३४४ उमेदवार

0
10

गोंदिया दि.२० : प्रथमच होऊ घातलेल्या नवनिर्मित नगरपंचायतीच्या निवडणुक रणांगणात ३४४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. (दि.१९) नामांकन मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. दरम्यान देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही नगरपंचायतीच्या निवडणुक रिंगणातून ५२ उमेदवारांनी माघार घेतली.
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच अनेक ठिकाणच्या तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना विसर्जित करून त्यांचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यात आले. नवीन परिसिमन तयार करून यंदा प्रथमच नगरपंचायतीच्या निवडणुका १ नोव्हेंबर रोजी घेण्यात येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, आमगाव आणि सालेकसा या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे विसर्जन करून नव्याने नगरपंचायत स्थापन करण्यात आल्या. निवडणुकीचा कार्यक्रमदेखील घोषित झाला. मात्र, सालेकसा आणि आमगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीला घेऊन न्यायालयात याचिका पोहचल्याने या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीवर तात्पूर्ती स्थगिती आहे. १ नोव्हेंबर रोजी देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान केले जाणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. दरम्यान नामांकन मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. दरम्यान ५२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आजघडीला ३४४ उमेदवार नगरपंचायतीच्या मागयुद्धात तटस्थ उभे आहेत. गोरेगाव नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी ९९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. दरम्यान २३ उमेदवारांनी निवडणुकीच्या युद्धातून माघार घेतली असून ७६ उमेदवार तटस्थ राहिले आहे. अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी ९० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. पैकी ८ उमदेवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून ८२ उमेदवार रिंगणात कायम आहेत. विशेष म्हणजे अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या तिसNया वार्डात १२ उमेदवार होते. यापैकी ५ उमेदवारांनी माघार घेतली. तर चौथ्या वार्डातून एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतली आहे. देवरी नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी जिल्ह्यात सर्वाधिक १२३ उमेदवारांनी नामांकन केले होते. पैकी १८ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले असून १०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तटस्थ आहेत. सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी ८४ उमेदवारांनी नामांकन भरले होते. यापैकी तिन उमेदवारांनी नामांकन मागे घेतले असून ८१ उमेदवारांमध्ये निवडणुकीची घमाशान रंगणार आहे. येथील १७ व्या प्रभागात सर्वाधिक ९ उमेदवार असल्याने या प्रभागातील चुरस अधिकच वाढली आहे. (दि.२०) सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार असून चिन्ह वाटप होताच प्रचार-प्रसाराला वेग येणार आहे. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची वेळ ७.३० ते ५ वाजतापर्यंतची होती. आता मात्र, सकाळी ७.३० ते ३ वाजतापर्यंत असल्याचे जाणवते. दरम्यान मतदानासाठी कमी कालावधी असल्याने गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.