32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ बिबट्याचा धुमाकूळ : इसमाला केले जखमी

बिबट्याचा धुमाकूळ : इसमाला केले जखमी

0
52

blank

तिरोडा, दि.3 : नागझिरा व कोका अभयारण्यालगत तिरोडा तालुक्यात येणार्‍या ग्राम नवेझरी येथे बिबट्याने मागील 2 महिन्यापासून धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या बिबट्याने रामकृष्ण जगन्नाथ निमजे यांच्या घरात शिरून शेळीला ठार केले, तर नामदेव उके रा. नवेझरी या इसमाला जखमी केले. ही घटना बुधवार, 2 जूनच्या रात्री 11 वाजता घडली.

सविस्तर असे की, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत येणारा नागझिरा व कोका अभयारण्यालगत तिरोडा तालुक्यातील नवेझरी हे एक गाव आहे. अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात हे वन्यप्राणी लगतच्या गावांकडे धाव घेतात. जंगल परिसरातील नवझेरी येथे बिबट्याने दोन महिण्यापासून मोठा धुमाकूळ घातला आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास रामकृष्ण निमजे यांच्या घरी घुसून छपरीत बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केले.शेळी मरण पावल्याची आरडाओरडा होताच त्यांच्या घरासमोर राहणारे नामदेव शिवरू उके घराच्या बाजूला लघुशंकेसाठी गेले होते. नेमक्या त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यांना उपचारासाठी रात्रीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावर बिबट्याने पंजा मारून जखमी केले.

वन विभागाचे बिट गार्ड कडवे याना फोनद्यावरे सदर घटना कळविण्यात आली. पण ते रात्री आले नाही. तसेच वन विभागाचे कर्मचारी रात्रीपाळीची ड्यूटी, पेट्रोलींग सुध्दा करीत नाही. जगंलातील वनतळी, हँडपंप, सौरउरदेवर चालणारे उपकरणे बंद असल्याने पाणी पिण्यासाठी वन्य प्राण्यांचे आगमन गावांकडे होत आहे. याकडे वन अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते.या प्रकारामुळे नवेझरी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. प्रत्येक दोन-चार दिवसांत या परिसरात बिबट्याचे हल्ले होतात. काही दिवसांपूर्वी मा्ल्ही येथे बिबट्याचा मुत्यू झाला होता. पण कशाने मृत्यू झाला होता, याचा अद्याप पत्ता लागला नाही. यावरून वन विभाग वन्यप्राण्यांची किती काळजी घेते हे लक्षात येते.

नवेझरी येथील नामदेव उके व रामकृष्ण निमजे यांना झालेल्या नुकसानीचा आर्थिक मोबदला वन विभागाकडून तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी गावकरी व संरपच महेंद्र भांडारकर यांनी केली आहे.

blank