स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

0
8

गोंदिया दि..३१: गेल्या ९ वर्षांपूर्वीच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतकर्‍यांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्याची मागणी करीत जनमंचच्यावतीने शुक्रवारी (दि.३0) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांची आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई व घटत चाललेले उत्पन्न या कोंडीत शेतकरी सापडलेला असून त्यामुळे ते जीवन संपवत आहेत. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबिला आहे. भारतीय शेतकर्‍यांची ही अवस्था सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नोव्हेंबर २00४ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापन केली. मात्र या आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारसींना लागू न करता उलट सरकारी कर्मचार्‍यांना १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकर्‍यांच्या श्रमाला योग्य भाव मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची असताना, सरकार कर्मचार्‍यांवरच मेहरबान दिसून येत आहे. ही स्थिती देशासाठी धोकादायक ठरणार असल्याने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात, अशी मागणी जनमंचने केली आहे. आपल्या मागणीसाठी जनमंचच्यावतीने शुक्रवारी (दि.३0) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी जनमंचचे जिल्हा संयोजक दिलीप डोये, गोविंद तुरकर, राजेंद्र राठोड, भय्यालाल वंजारी, बाबू मेंढे, सविता बेदरकर, विजय सावंत,शसेंद्र भगत व अन्य उपस्थित होते.