वाघाच्या हल्ल्यात वृध्द जखमी;साखळी येथील घटना

0
26

तुमसर –गुरे चारण्याकरिता गेलेल्या वृध्दावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील साखळी जंगलशिवारात घडली. वृध्दाचे नशीब बलवत्तर म्हणून वाघाने त्याला जखमी अवस्थेत सोडून दिले.
साखळी येथील रहिवासी भिमराज लटारू बिसने (वय 60) हा नेहमीप्रमाणे आपली गुरूढोरे चारण्याकरिता गावाबाहेरील जंगलपरिसरात गेला होता. दरम्यान दुपारच्या सुमारास त्याच्यावर वाघाने हल्ला केला. यावेळी म्हाताèयाने जोरजोरात आरडाओरड केल्याने वाघाने त्याला सोडून जंगलाची वाट धरली. गावातील नागरिकांना माहिती होताच जखमी अवस्थेत वृध्दाला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. येथे प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पुंडे, उमेश पटले उपस्थित होते.
विशेष म्हणजे गोबरवाही जवळील नागझिरा जंगलात 17 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. यात पुनाराम रामा कुसराम (53) रा. कवलेवाडा हा गुराखी जखमी झाला होता. चार दिवसानंतर पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती तुमसर तालुक्यात झाल्याने सदर वाघाला मानवी रक्ताची चटक तर लागली नसावी अशी भिती व्यक्त आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून या हल्लेखोर वाघाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.