जिल्हास्तरीय राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आशा सेविकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

0
12

गोंदिया दि.16 : डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती व जनजागृती करणे हा आहे. दि.16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांना या आजाराबद्दल जागरुक करणे आणि त्याची लक्षणे, कारणे आणि उपचाराबद्दल माहिती देणे असा आहे. या आजाराबाबत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागरुकता असली तरी या आजाराला बळी पडतात. डेंग्यू या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्याबाबत अचूक माहिती व्हावी यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
दि.16 मे रोजी आरोग्य व हिवताप विभागाच्या एकत्रित सहकार्याने गोरेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे व गट विकास अधिकारी जाधव साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण व जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी विजय आखाडे उपस्थित होते.
ह्याप्रसंगी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वाघमारे यांनी डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्तटाय नावाच्या डासामुळे होतो.या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये अंडी घालतात, त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठवलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून न ठेवण्याचे सांगितले.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी डेंग्यू आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जसे अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावे. मच्छरदाणी व क्रीमचा वापर करावा. साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करावीत. खाली न करता येणाऱ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडावे. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर, डिस्पोजल इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी अथवा पातळ कपडा नेहमी बांधावा. आपल्या घराबाहेर पाणी साचू देऊ नका, घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. अंगणात व परिसरातील खड्डे बुझवावे, त्यात पाणी साचणार नाही या बाबतचे आरोग्य शिक्षण गावपातळीवरील लोंकामध्ये आरोग्य कर्मचारी यांनी पोहचविण्याबाबतचे मार्गदर्शन केले.
गट विकास अधिकारी जाधव साहेब यांनी नागरिकांनी डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे सांगितले. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो.त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
दुसर्या कार्यक्रमात राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात किटकजन्य कार्यक्रम उत्तमपणे राबविल्याबद्दल आशा सेविका यांना त्यांच्या कार्याबद्दल प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी जिल्ह्यात गृहभेटीच्या माध्यमातुन आशा सेविका यांच्या माध्यमातुन विशेष सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणी साठे तपासुन पाणीसाठ्यात डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करणे ,रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा बेटचे द्रावण टाकणे महत्वाचे असते.ताप सद्रुष लक्षणे असलेल्या लोकांचे आर.डी.के. किट द्वारे रक्त तपासणी करण्यात येत असते.हतीरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत लोकांना डिईसी व अल्बेंडेझॉल गोळ्या समक्ष खावु घालणे असे विविध कार्याबद्दल आशा सेविका यांना यावेळी गौरविण्यात आल्याची माहीती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी विजय आखाडे, आरोग्य सहाय्यक किशोर भालेराव,आरोग्य पर्यवेक्षक श्री.डोंगरे, श्री.ठाकूर,श्री.भगत,श्री.जायभाय,श्री.दिपवादे,श्री.आशिश बले,श्री.पंकज गजभिये,वर्षा भावे यांचे सह आरोग्य विभागातील कर्मचारी व गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी गोरेगाव येथील सर्व कर्मचारी तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आशा कार्यकर्ती व गट प्रवर्तक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका आरोग्य सहाय्यक आर.टी.पटले व आभार प्रदर्शन किशोर भालेराव यांनी केले.