घोडेझरी ठरले जिल्ह्यातील पहिले ‘लसवंत’ गाव

0
74
  • इतर गावांपुढे ठेवला आदर्श
  • लसवंत व्हा सुरक्षित रहा

भंडारा, दि.27: कोरोना या संसर्गजन्य आजाराला अटकाव करण्यासाठी जिल्हाभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणा गाव निहाय शिबीर आयोजित करत आहे. लाखनी तालुक्यातील घोडेझरी या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ‘लस’ घेऊन जिल्ह्यातील पहिले ‘लसवंत’ गाव होण्याचा बहुमान पटकविला आहे. गावकऱ्यांच्या या प्रतिसादाबद्दल जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गावकरी व प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले.

‘टोचाल तर वाचाल’ अस एक संदेश लसीकरणाबाबत सर्व समाज माध्यमावर फिरत आहे. यात काही प्रमाणात सत्यताही आहेच. कोरोना या महामारीवर ‘लस’ हा एकमेव उपाय आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लस देण्याचे नियोजन केले आहे. अनेक गावात लसीकरणाचे विशेष शिबीर लावण्यात येत आहे. लाखनी तालुक्यातील घोडेझरी गावात 941 पात्र लाभार्थी असून या सर्व लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. शंभरटक्के लसीकरण झालेले घोडेझरी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.

लाखनी तालुक्यातील घोडेझरी येथे आज लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. गावाची एकुण लोकसंख्या 1054 असून 18 वर्षे व त्यावरील पात्र लाभार्थ्यांची संख्या 941 एवढी आहे. या सर्व व्यक्तींनी कोविड 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 670 असून 271 लाभार्थी त्यांच्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत.

गावातील नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे लस घेऊन अन्य गावांसमोर आदर्श ठेवला आहे. प्रत्येक नागरिकांनी कोरोनाच्या बचावासाठी ‘लस’ घ्यावी हाच संदेश या गावाने दिला आहे. ‘लस’ ही पूर्णपणे सुरक्षित असून सध्यातरी कोरोनावर एकमेव उपाय लस हाच आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज तज्ज्ञ वर्तवित असून या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाने गावातील पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के लसीकरण करुन घेतल्यास जिल्हा कोरोनापासून दूर राहील व नागरिकांचे स्वास्थ अबाधित राहील.

  ग्रा.पं.घोडेझरी येथे कोरोना प्रतिबंधक लस घेणेबाबत खूप चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसिद्धी करण्यात आली आहे. सरपंच, सर्व सदस्य व इतर पदाधिकारी तसेच ग्रामसेवक, तलाठी व इतर कर्मचारी यांनी याबाबत समूहाने काम केले. ग्राम पंचायतस्तरावर पदाधिकारी व कर्मचारी यांचे गट करण्यात आले. या सर्व गटांमध्ये लसीकरणासाठी शिल्लक असलेल्या ग्रामस्थांची यादी विभागून देण्यात आली. सर्व गटांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले. या सर्व गटांद्वारा ग्रामस्थांची वैयक्तिक भेटी घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

या सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर घोडेझरी येथे लसीकरणाचे चार कॅम्प घेण्यात आले व सर्व ग्रामस्थांचे पहिल्या डोसचे लसीकरण करून घेण्यात आले. प्रत्यक्ष लसीकरण कॅम्प च्या दिवशी, डाटा एन्ट्री करण्यासाठी चार व्यक्तींची नेमणूक, उमेद महिला बचतगटाच्या महिलांची मदत, शिक्षकांच्या द्वारे केलेली प्रचार प्रसिद्धी, आरोग्य विभागाद्वारे लसी व अनुषंगिक बाबींचा योग्य पुरवठा, या सर्व बाबींमुळे सर्व पात्र ग्रामस्थांना लसीचा पहिला डोस देणे शक्य झाले.

या यशामागे या गावच्या सरपंच रेखाताई पडोळे, आशा वर्कर वृंदाताई दामले, पोलीस पाटील सुनील लुटे, ग्रामसेवक शैलेश लंजे, तलाठी रितेश्‍ देशमुख, ग्रामपंचायत सेवक काशिनाथ सेलोकर, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक ए बी सीवनकर, अंगणवाडी सेविका पुष्पा ठक्कर, कल्पना चौधरी, मदतनीस प्रीती काळे, ऑपरेटर राजूभाउ राघोर्ते, उमेद बचतगटातील महिला इत्यादी आणि गावकरी जनता यांचे सहकार्य लाभले. लसीकरण योग्य रीतीने होण्यासाठी मुरमाडी (तूप) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सुशील मरस्‍कोले व त्यांची संपूर्ण टीम, भाग्यश्री मदनकार (ए एन एम)  यांची मोलाची मदत लाभली.

आज घोडेझरी येथे नायब तहसीलदार लाखणी छबिलाल मडावी, कोविड समन्वयक तालुका आपत्ती व्यवस्थापन लाखणी नरेश नवखरे यांनी भेट देऊन सर्वांचे अभिनंदन केले व  प्रभारी तहसीलदार प्रतिभा दोनोडे, गटविकास अधिकारी  लाखनी डॉ शेखर जाधव, नायब तहसीलदार लाखनी धर्मेंद्र उरकुडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील हटनागर, गटशिक्षणाधिकारी श्री. बावनकुळे यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या यशस्वी उपक्रमाबद्दल ग्रा.पं.घोडेझरी चे विशेष अभिनंदन जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके आणि जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.माधुरी माथुरकर यांनी केले आहे. सर्व ग्रामस्थांना लसीचा दुसरा डोस देणेबाबत ग्रामपंचातीने पुढाकार घेतला आहे. ग्रा.पं.घोडेझरी चे याबाबत सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.