मासळचा चैतन्येश्‍वर साखर कारखाना भंगारात

0
70

लाखांदूर-समृद्धीचे स्वप्न दाखवून सन २000 मध्ये पायाभरणी झालेला लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील चैतन्येश्‍वर साखर कारखाना भंगारात पडला आहे. कारखान्याच्या नावावर फक्त लोखंडी सांगाळा उभा करुन कारखान्याला वार्‍यावर सोडण्यात आले. या कारखान्याची संपूर्ण चौकशी करुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी लाखांदूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून होत आहे. शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बालू चुóो, अँड. मोहन राऊत, प्रमोद प्रधान, मिलिंद डोंगरे, राकेश राऊत, रेशीम परशुरामकर, बाळू रणदिवे, किशोर वाघमारे, जीक्रिया पठाण, अमित फुलबांधे, मुदस्सीर पठाण, राजेश कावळे, रजनीकांत खंडारे, नरेश सोनटक्के यांनी पत्रपरिषदेतून केली आहे.
मासळ येथील चैतन्येश्‍वर साखर कारखाना उभारणीचे काम सन २000 मध्ये सुरू करण्यात आले. हा कारखाना उभा करण्यासाठी अनेक शेतकर्‍यांकडून शेअर्सरुपी मोठमोठय़ा रक्कमा घेण्यात आल्या. तब्बल ९४ कोटींचे कर्ज घेण्यात आले. साखर कारखान्याकरीता ४0 एकर शेतजमीन शेतकर्‍यांकडून त्यांच्या मुलांना कारखान्यात नोकरीचे आमिष देऊन नाममात्र किंमतीत विकत घेण्यात आल्या. त्यापैकी तीस एकर जागेचे विक्रीपत्र झालेले असून दहा एकर जागेचे विक्रीपत्र अद्याप झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झालेत.
कारखान्याकरीता लाखांदूर तालुक्यातील सहा गावात सेंटर उभारण्यात आले होते. यामध्ये मासळ, आसगाव, विरली बु., परसोडी /नाग, पालांदूर, बारव्हा या गावी ऊस लागवडीकरीता व शेअर्स जमा करण्याकरिता सात कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.
शेतकर्‍यांनी ऊसाची लागवड केली. त्यांचा ऊस बिजाईत म्हणून वापरला गेला. त्यांच्या ऊसाची रक्कम अद्याप मिळाली नाही. काही शेतकर्‍यांचा ऊस गुळ बनवण्याकरीता वापरण्यात आला. विविध सेंटरवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे मानधन व सेंटरच्या कार्यालयाचा भाडा देण्यात आला नाही. एवढ्या मोठ्या जागेचा व रकमांचा गैरव्यवहार झाल्यानंतर चैतन्येश्‍वर साखर कारखाना बंद करण्यात आला. त्या ठिकाणी कोणत्याही मशीन आणण्यात आल्या नव्हत्या. अनेक शेतकर्‍यांच्या शेअर्सरूपी मोठय़ा रकमा, उसाची थकबाकी, कर्मचार्‍यांचे मानधन, कार्यालयाचा भाडा असा कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आलेला असून दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आजघडीला कारखान्याच्या नावावर फक्त लोखंडी सांगाळा शेतकर्‍यांचे दु:ख पाहत उभा आहे.

बंद कारखान्यावर कर्जाची उचल
मासळ येथील चैतन्येश्‍वर साखर कारखाना सुरुवातीपासूनच बंद अवस्थेत आहे. साधी मशिनही लावण्यात आली नाही. असे असताना या कारखान्यावर २0११ पासून २0१५ पर्यंत कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची उचल करण्यात आली आहे. तसेच एप्रिल २0२१ मध्ये बुलढाणा अर्बन बॅंकेच्या नागपूर शाखेतून ४ कोटींचे कर्ज उचलण्यात आले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कर्ज घेऊनही कारखाना पूर्णत्वास जात नसेल तर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे काय झाले? याचे उत्तर जनतेला मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बालू चुन्ने यांनी केली आहे.