सैनिक टाकळी येथील ‘सुभेदार’ कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

0
15

सैनिक टाकळी– इसविसन १९१४ ते २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंब महाराष्ट्रातील वैशिष्टयपूर्ण कुटुंब ठरले असून त्यांचा नुकताच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. सैनिक टाकळी येथील माजी सैनिक कल्याण मंडळाच्या सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑ. ले. बी. एस. पाटील होते.
कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील टाकळी या गावातील घरटी एक तरी व्यक्ती सैन्यात असल्यामुळे या गावाला ‘सैनिकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते.
इसविसन १९६८ साली देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या सहकार्याने भारताचे लष्करप्रमुख जनरल पी. पी. कुमार मंगलम, जनरल एस. पी. थोरात आणि ले. जनरल मोती सागर टाकळी गावात आले होते. त्यावेळी गावच्या आजी-माजी सैनिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. फौजी गणवेश परिधान करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहिलेले जवान पाहताना लष्करप्रमुख भारावून गेले. टाकळी गावची महती त्यांनी स्वतः जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी ‘इस गाव का नाम सिर्फ टाकळी नही, सैनिक टाकळी होना चाहिए’ असे गौरवपूर्ण उद् गार काढले. तेव्हापासून गावाला ‘सैनिक टाकळी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलिस दलाच्या माध्यमातून येथील अनेक लोक आजही देशसेवा करतात. या गावचा जवान नाही असा एकही लष्करी तळ देशात नाही असे अभिमानाने सांगितले जाते. अगदी ब्रिटीश काळापासून येथील तरुणांनी लष्कराची वाट धरली. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारने राजे, महाराजे, नबाब, जमीनदार यांना आपल्या इलाक्यातून जवान पाठवण्याचा हुकूम काढला. त्यावेळी सैन्यात भरती होणार्‍या व लढाईवर जाणार्‍यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जमिनी इनाम दिल्या गेल्या. कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा, मलखांब, लेझीम अशा इतर मैदानी खेळात तरबेज असणारे जवान भरती झाले.
सैनिक टाकळी येथील रावसाहेब मालोजीराव जाधव हे पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते. ते टाकळी गावातील पहिले सुभेदार होते तत्तपश्चात या कुटुंबाला ‘सुभेदार’ या टोपन नावाने ओळखले जाऊ लागले. दुसर्‍या महायुद्धामध्ये त्यांचा मुलगा ज्ञानदेव रावसाहेब जाधव यांनी सहभाग घेतला होता. ते सुभेदार मेजर पदावर कार्यरत होते. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन इंग्रजांच्या नोकरीचा त्याग केला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. यांचाही मुलगा ऑ. कॅप्टन बापूराव जाधव यांनी इसविसन १९६५ व इसविसन १९७१ च्या भारत-पाक युद्धात भाग घेतला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गावातील आजी-माजी सैनिकांना एकत्र करून ‘माजी सैनिक कल्याण मंडळ’ ची स्थापना केली. आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या युद्धात शहीद झालेल्या टाकळी गावच्या १८ जवानांचे स्मारक उभे केले. गावातील वीर माता, वीर पत्नी व आजी-माजी सैनिकांच्या समस्या शासनासमोर मांडल्या. त्यांचा मुलगा भरतकुमार बापूराव जाधव बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपमध्ये नाईक पदावर होता. त्यांनी इसविसन १९८४ पासून इसविसन २००१ पर्यंत देशसेवा केली. सध्या सुभेदार कुटुंबातील पाचव्या पिढीतील अक्षय भरतकुमार जाधव हाही इसविसन २०१६ पासून सिपाई या पदावर भरती झाला आहे.
इसविसन १९१४ पासून इसविसन २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत उल्लेखनिय कुटुंब ठरले आहे. त्याबद्दल सुभेदार कुटुंबाचे प्रतिधिनी म्हणून नाईक भरतकुमार बापूराव जाधव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी शाल, श्रीफळ, मेडल, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत केले. यावेळी उपसरपंच सुदर्शन भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद पाटील, गाव कामगार पोलिस पाटील सौ. सुनिता पाटील, लेखक मनोहर भोसले, अनुवादक राज धुदाट, इतिहास संशोधक अन्सार रमजान पटेल, सौ. संजीवनी सुनील पाटील, सौ. शीतल मनोहर भोसले, सौ. रोझमेरी राज धुदाट आदी सह निवडक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उदय पाटील यांनी केले. नाईक भरतकुमार बापूराव जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.