मोटार वाहन निरीक्षकांच्या बंदूकीतून चालली गोळी

0
18

गोंदिया ,:दि. १६-
चौकशी कक्षातील टेबलावरून खाली पडल्यामुळे बंदूकीतून गोळीबार होऊन ट्रकचालकाच्या जांघेवर गोळी लागल्याने ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या देवरी जवळील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चेक पोस्ट येथे शनिवारी संध्याकाळी ६ ते ७ वा. सुमारास घडली. मोहम्मद शबीर खान (३६) रा.नागपूर असे सदर घटनेत जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
दरम्यान या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाला गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून लागलेली गोळी काढली असल्याची माहिती आहे. सद्या जखमी ट्रकचालकाची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत असले तरी या घटनेविषयी परिसरात अनेक चर्चेंना पेव फुटले असून प्रकरण दाबण्याचा प्रकार होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. देवरी तालुक्यातील शिरपूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर उपप्रादेशिक परिवहन विभागांतर्गत चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. दरम्यान या ठिकाणी राज्यात येणारे व राज्याबाहेर जाणार्‍या ट्रक, मोटार आदी वाहनांची तपासणी केली जाते. दरम्यान घटनेच्या वेळी तेथील कार्यरत मोटार वाहन निरीक्षक नितीन उके यांच्या सुट्टीची वेळ झाल्याने त्यांनी आपले सर्विस रिवाल्वर असलेला कंबरपट्टा टेबलावर ठेवला त्यातच ट्रक चालक मोहमद शाबीर हा नागपूरकडून बिलासपूरकडे जात असता स्वत:च्या वाहनाची कागदपत्रे तपासणी करण्याकरिता चौकशी कक्षात दाखल झाला. दरम्यान त्याठिकाणी ठेवलेल्या रिवाल्वर असलेल्या कंबर पट्टयाला धक्का लागल्याने सर्विस रिवाल्वर टेबलावरून खाली पडली. यातच रिवाल्वरमधून फायर होऊन जवळच उभा असलेला ट्रक चालक शाबीर खान यांच्या जांगेत गोळी लगली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयत भर्ती करण्यात आले. दरम्यान  रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून सदर गोळी बाहेर काढली. 
सद्या जखमी ट्रक चालकाची स्थिती धोक्याबाहेर सांगण्यात येत आहे, असे असले तरी टेबलावरून खाली पडताच बंदूकीतून गोळी चालचीच कशी, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत असून या प्रकरणी देवरी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी आतापर्यंत या घटनेला चौकशीतच ठेवले आहे.