धान्य खरेदीत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा बागुलबुवा

0
10

ब्रह्मपुरी,दि. १६-तालुक्यातील मेंडकी येथील गणेश राईस मिल शासकीय धान्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याबाबतची माहिती थानेश्‍वर कायरकर यांनी काही वृत्तपत्रात दिली होती. परंतु ते खोटे असल्याचा अहवाल जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी दिल्यामुळे अफरातफर झालीच नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा बागुलबुवा केला जात असल्याचे गणेश राईस मिलचे माजी अध्यक्ष रामचंद्र नगरे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या पत्रपरिषदेला संचालक प्रभाकर भुते, खेमराज तिडके, दिवाकर मानेरे, राजेश्‍वर मगरे आदींची उपस्थिती होती.
सदर प्रकरणातील तक्रारकर्ते थानेश्‍वर कायरकर यांनी शासकिय धान्य खरेदीमध्ये अफरातफर झाल्याचे एप्रिल महिन्यामध्ये लेखी तक्रार जिल्हा मार्केटिंग कार्यालय, चंद्रपूर व पोलिस स्टेशन मेंडकी येथे दाखल केली होती. या प्रकरणाची रीतसर चौकशी करून मा. जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी २८ एप्रिल २0१५ रोजी पोलिस निरीक्षक ब्रम्हपुरी यांना रितसर अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये शासनाच्या करारनाम्यानुसार अटी व शर्तीस बाध्य राहून संस्थेने २0१३-१४ मध्ये १२४४२.६८ क्विंटल धान्याची खरेदी केली होती. त्यानुसार शेतकर्‍यांना पेमेंट केले होते. संस्थेने २ एप्रिल २0१४ ते ४ मे २0१४ पर्यंत शेतकर्‍यांकडून १३८२ क्विंटल धान्याची खरेदी केली होती. त्यांना शासनाकडून बोनस अदा करण्यात आला आहे. १६ जून २0१४ ते २0 जून २0१४ पर्यंत शासनाकडून बोनस नसल्याने शेतकर्‍यांकडून ११७५ क्विंटल धान्य खरेदी करून फक्त धानाची रक्कम अदा केली आहे. शेतकर्‍यांच्या रजिस्टरमध्ये शेतकर्‍यांची स्वाक्षरी घेऊन त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. संस्थांचे मागील तीन ते चार वर्षांपासून धान्य खरेदीचे काम शासनाच्या अटी शर्ती व नियमानुसार करीत असून संस्थेचे शासनाने २0१३-१४ चे लेखापरीक्षण अहवालात कोणतेही दोष व त्रृटी दिसून येत नाही. संस्थेने संचालक मंडळाचे खरेदीपोटी घेतलेले ठराव, लेखापरीक्षण अहवाल व पेमेंट रजिस्टरही दफ्तरी दिसून येत आहे. त्यामुळे संस्थेने कोणत्याही प्रकारची अफरातफर के ल्याचे दिसत नसल्याचे रामचंद्र नगरे यांनी सांगितले.
अशा प्रकारे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी आपला अहवाल स्पष्ट केला आहे. तक्रारकर्ता थानेश्‍वर कायरकर हे प्रकरण हे गणेश राईस मिल निवडणूक डोळय़ासमोर ठेवून सत्ताधारी संचालकांना नाहक बदनाम करण्याच्या उद्देशाने राजकीय दबावाखाली वारंवार खोट्या तक्रारी व वृत्तपत्रात खोटा मजकूर देत आहे. निवडणुकीची आचारसंहिता असतानाही संस्थेच्या उपाध्यक्षाला हाताशी धरून १७ ऑक्टोबर २0१५ रोजी संस्थेचे कार्यालय सिल केले आहे. याबाबत लेखी तक्रार पोलिस स्टेशन व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ब्रम्हपुरी यांना कळविले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ब्रम्हपुरी यांनी ७ नोव्हेंबर २0१५ ला चौकशी अहवाल तयार करून या प्रकरणात कोणतीही अफरातफर झाली नाही असे स्पष्ट केले आहे. व राईस मिलचे सिल तोडून राईस मिल खुली करण्याचे आदेश उपाध्यक्ष यांना देण्यात आल्याची माहिती नगरे यांनी पत्रपरिषदेत दिली.