नगरपंचायत भवनात आमदारांचा जनता दरबार

0
37

अर्जुनी-मोरगाव : आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध विकास योजनांच्या संदर्भात जनता दरबार घेतला.अर्जुनी-मोरगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन पाच वर्षे झाली. कोरोना महामारीमुळे नगरपंचायतवर प्रशासक राज आहे. शहरात घरकुल, आरोग्य, शौचालय, विविध मूलभूत सुविधा, अंगणवाडी दुरुस्ती, घरकुल भूखंड वाटप, पाणी पुरवठासारख्या समस्या आवासून उभ्या आहेत.

या समस्यांना मार्गी लावण्यासाठी आ.चंद्रिकापुरे यांनी जनता दरबाराचे आयोजन नगरपंचायत भवनात केले. या वेळी नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, सुशांत अरु, प्रफुल गाड़बैल उपस्थित होते.

सिंगलटोली आणि बरडटोली येथील नागरिकांना अतिक्रमणाच्या जाचक अटीमुळे घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत काळात याच परिसरातील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला. मात्र नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले आणि नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळणे बंद झाले. या रहिवाश्याना घरकुलाचा लाभ देण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदारांनी दिले.

या वेळी उपस्थित नागरिकांनी आमदारांसमोर स्थानिक समस्यांचा पाढा वाचला. आमदारांनी घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना, भुखंडाचे, प्रलंबित वनहक्क पट्टे संदर्भात त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यधिकारी जाधव यांना दिले.या वेळी जिल्हा सचिव राकेश जायस्वाल, शहर अध्यक्ष महेंद्र शहारे, आर.के. जांभुळकर, माजी नगरसेविका प्रज्ञा गणवीर, नाना शहारे, नगरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.