आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे संसार उघड्यावर

0
13

गोंदिया : प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे जिल्ह्यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे या शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. कर्तव्याचे ठिकाण एका टोकावर तर कुुटुंबातील प्रिय व्यक्ती दुसऱ्या टोकावर अशा परिस्थितीमुळे या शिक्षकांचे मन सैरभैर झाले आहे. रखडलेल्या आंतरजिल्हा बदल्यांना कंटाळून आता या शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले आहे.

राज्यभर कार्यरत असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ३०० ते ३५० भूमिपुत्रांना संबंधित जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र मिळूनही गोंदिया जिल्हा परिषद त्यांना अनेक वर्षापासून पदस्थापना देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची पदे पदोन्नतीने भरणे आवश्यक असतानाही त्या पदोन्नत्या अनेक वर्षापासून केल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांच्या जागा रिक्त होत नाही. तसेच सेवानिवृत्तीने रिक्त झालेले पदसुद्धा भरण्यात आले नाही.

जिल्हा बदलीसंदर्भात गोंदिया जिल्हा परिषदेत चौकशी करण्यासाठी जाणाऱ्यांना प्रशासनाकडून योग्य वागणूक मिळत नाही.आंतरजिल्हा बदलीसंदर्भात स्थगिती उठवणारा अध्यादेश शासनाने काढूनही जिल्हा परिषद प्रशासनाला आंतरजिल्हा बदल्यांना मुहूर्त सापडत नाही. जिल्हा बदली आज होईल, उद्या होईल या भाबळ्या आशेवर आंतरजिल्हा बदलीग्रस्त भूमिपूत्र शिक्षक व त्यांचे कुटुंब जगत आहेत.जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या लेकरांना गोंदिया जिल्हा परिषदेत बदल्या द्याव्यात, अशी अपेक्षा कुटुंबीय करीत आहेत.