कोविड नियमांचे पालन करूनच सण उत्सव साजरे करा – जिल्हाधिकारी संदीप कदम

0
37
????????????????????????????????????

भंडारा,दि.3:- आगामी काळात येणारे गणेशोत्सव, गौरी, दुर्गोत्सव, शारदोत्सव व ईद-ए-मिलाद सण व उत्सव नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवत शांततेने कोविड नियमांचे पालन करूनच साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित जातीय सलोखा समिती बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील, तहसीलदार बाळासाहेब टेळे, नीलिमा रंगारी, रमेश कुंभरे, मुख्याधिकारी विनोद जाधव व अधिकारी उपस्थित होते.

पोळा, गणेशोत्सव, गौरी, शारदा उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव होऊ घातले आहेत. हे उत्सव साधेपणाने साजरे करण्यात यावेत. कोविडच्या तिसऱ्या लाटेची चर्चा देशभरात सुरू असून या पार्श्वभूमीवर येणारे सण उत्सव कोविड नियमांचे पालन करूनच साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

केरळ राज्यात ओनमनंतर रुग्ण संख्या अचानक वाढली. हे उदाहरण पाहता आपण सण व उत्सव साजरे करतांना अधिक खबरदारी घेतली पाहिजे. शासनाच्या नियमांचे पालन करूनच उत्सव साजरे व्हावेत. “उत्सव हा लसोत्सव” व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

शांतताप्रिय उत्सवाची जिल्ह्याची परंपरा कायम ठेवा असे आवाहन करुन पोलीस अधिक्षक वसंत जाधव म्हणाले की, ईद व गणेशोत्सवा दरम्यान उत्सवाला गालबोट लागेल असे काही घडू देवू नका. उत्सवादरम्यान सलोख्याचा उत्सव आपण सर्व साजरा करु या. कोरोनाचे संकट अजून टळले नसून उत्सवात अतिउत्साह न करता प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी. प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय असावा ही दक्षता दोन्ही बाजूने घेण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करून वसंत जाधव म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. शांतता राखण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सामाजिक एकोपा व सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. हा संदेश समाजात पोहचविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे ते म्हणाले.

शक्यतो डि.जे. मुक्त उत्सव साजरा करावा. आवाजाचा थेट परिणाम कर्ण बधिरतेवर होत असून ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ध्वनी विरहित उत्सव ही संकल्पना अमलात आणावी. सोशल मीडियाचा वापर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी  विविध शांतता समितीच्या सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. यावर्षीचा गणेशोत्सव व ईद सामाजिक एकोपा व ऐक्याचे प्रतिक राहील, अशी ग्वाही या प्रसंगी देण्यात आली. बैठकीचे संचालन प्रभारी उपअधिक्षक (गृह) राजेश थोरात यांनी केले. उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक एन. व्ही. निस्वादे यांनी मानले. या बैठकीस जातीय सलोखा समिती सदस्य, तंटामुक्त गाव मोहीम समिती अध्यक्ष, गणेश मंडळ अध्यक्ष व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.