बुद्ध विहार प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करा,अन्यथा रस्त्यावर उतरू

0
33

.मोरवाही येथील बौद्ध समाज बांधवांची पत्रपरिषदेतून मागणी

गोंदिया(ता.4) मागच्या बारा ऑगस्ट पासून गोंदिया तालुक्यातील मोरवाही येथे बुद्ध विहार तोडल्या संदर्भात न्याय मिळावा म्हणून बौद्ध समाज बांधवांचे धरणे आंदोलन सुरु आहे. यात समाज बांधवांकडून प्रशासनाला अनेक निवेदने तसेच पोलिसात तक्रार सुद्धा करण्यात आली. परंतु प्रशासनातर्फे अद्यापही दोषींवर कारवाई न झाल्याने येथील बौद्ध समाज बांधवांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. दोषींवर तात्काळ कारवाई करून त्वरित नवीन बुद्ध विहार बांधून द्यावे, अन्यथा सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करू,असा पवित्रा येथील बौद्ध समाज बांधवांनी शुक्रवारी (ता.3) मोरवाही येथे धरणे आंदोलन मंडपात घेतलेल्या पत्र परिषदेतून दिला आहे.
मागच्या दोन वर्षांपूर्वी पवन भागवत हेमणे,चंद्रभान मुन्नालाल ठाकूर, राजू श्रीपत ब्राह्मणकर नमक कंत्राटदारांनी शासनाकडून कोणतीही परवानगी न घेता यथास्थितीत असलेले जुने बुद्ध विहार नवीन बनवून देण्याच्या नावाखाली जमिनदोस्त केले. या प्रकरणाला दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी अजूनही या कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपल्या धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी मोठी अडचण येत असून ते धार्मिक विधी पूर्ण करण्यापासून वंचित राहात आहेत. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासन व कनिष्ठ, कार्यकारी अभियंता जि.प. गोंदिया यांनी सदर बांधकामाची खोटी मोजमाप पुस्तिका सादर करून सदर बुद्ध विहार बांधकामासाठी आलेल्या शासकीय निधीची उचल करून अफरातफर केली आहे. असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी लावला आहे. दरम्यान येथील बौद्ध समाज बांधवांनी या प्रकरणाची तक्रार शासन स्तरावर जिल्हा प्रशासनाकडे करून ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक,कनिष्ठ, कार्यकारी अभियंता व संबंधित तिन्ही कंत्राटदारांवर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तक्रारीला आठ दिवसा पेक्षा जास्त काळ लोटला तरी अजूनही पोलीस प्रशासनाने या आरोपींची साधी चौकशी सुद्धा केली नाही. उलट पोलीस प्रशासन हे आंदोलनकारी बौद्ध समाजबांधवांची मानसिक पिळवणूक करीत असल्याचा आरोपही या समाज बांधवांनी लावला आहे.सदर कंत्राटदार हे जिल्ह्यातील चाबी संघटन पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांचे आमदार विनोद अग्रवाल यांच्याशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांच्या दबावाखाली जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन दोषी व्यक्तींवर कारवाई करीत नाही. तसेच जिल्ह्यात एवढे मोठे आंदोलन सुरु असतानाही जिल्हाधिकारी महोदयांनी या आंदोलनाला साधी भेट देण्याचे सौजन्य ही दाखविले नाही.त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव येत असल्याचा आरोपही उपस्थित समाज बांधवांनी लावला आहे. या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन दोषि ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, कनिष्ठ,कार्यकारी अभियंता तसेच संबंधित कंत्राटदारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्वरित नवीन बुद्ध विहार बांधून देण्यात यावे,अन्यथा न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करू आणि जर या आंदोलनाचे पडसाद समाजात उमटले तर त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. जिल्हा व पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही उपस्थित बौद्ध समाज बांधवांनी पत्रपरिषदेतुन दिला आहे. यावेळी पत्रपरिषदेत दिलीप मेश्राम, विजय मेश्राम, आशिष मेश्राम,राजकुमार मेश्राम, सचिन मेश्राम, अजय भालाधरे, रजनीकांत वैद्य, अर्चना भिमटे,सारिका मेश्राम,सुलोचना वैद्य, संगीता मेश्राम, शीला मेश्राम, शालीनी मेश्राम, माधुरी मेश्राम,अनिल मेश्राम, पंचम मेश्राम, कपिल रामटेके, पिंटू मेश्राम, उपस्थित होते.