गोंदियाच्या आरोग्य सेवेत दाखल होणार 25 रुग्णवाहिका

0
68

गोंदिया-रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल करता यावे, त्यांचा मृत्यू होऊ नये या उद्देशाने आरोग्य विभागाने आरोग्यसेवा सबळ करण्यासाठी पाऊल उचलले आहे. आरोग्यसेवा आयुक्तालयाने राज्यासाठी 463 रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत पैकी 25 रुग्णवाहिका गोंदिया जिल्ह्याचा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे या रुग्णवाहिका 102 या गरोदर माता, प्रसूत माता, नवजात शिशुंच्या आरोग्य सेवेसाठी कार्यरत होणार आहेत.
गोंदिया जिल्हा दुर्गम, आदिवासी, जंगल व्याप्त म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यातील अनेक गावांत आरोग्याच्या भौतिक सोयी-सुविधा पोहोचल्या नाहीत. कोरोना संसर्ग काळात भौतिक सोयी, सुविधांअभावी रुग्णांची चांगलीच गैरसोय झाल्याचे पहावयास मिळाले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेकदा रुग्णांचा जीवही जातो. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ, सबळ व्हावी या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने 463 रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याला सर्वाधिक 25, भंडारा 8, गडचिरोली 12, चंद्रपूर 20, अकोला 2, अमरावती 4, बुलढाणा 21, वर्धा व वाशिम जिल्ह्यासाठी प्रत्येकी 3 अशा विदर्भातील दहा जिल्ह्यांत 88 रुग्णवाहिका दाखल होणार आहेत.
या आरोग्य केंद्रांना मिळणार रुग्णवाहिका
जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत दाखल होणार्‍या रुग्णवाहिका या गोंदिया तालुक्यातील भानपुर, दवनीवाडा, एकोडी, खमारी, मोरवाही. सालेकसा तालुक्यातील बिजेपर, दरेकसा, काबराबांध, सातगाव. आमगाव तालुक्यातील बनगाव, खमारी. अर्जुनी मोर तालुक्यातील चान्ना बाक्टी, गोठणगाव, केशोरी, कोरंभीटोला, धाबेपावनी. देवरी तालुक्यातील फुटाणा, घानोडी, ककोडी. गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा, सोनी, तिल्ली मोहगाव. सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा, पांढरी या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे तिरोडा तालुक्यातील एकाही आरोग्य केंद्राचा यात समावेश नाही.
रुग्णवाहिका 102 सेवेसाठी
आरोग्य विभागाची 102 क्रमांकाची सेवा गरोदर, प्रसूत माता, नवजात शिशु यांच्यासाठी कार्यरत आहे. वरील क्रमांकावर संपर्क केल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होते. जिल्ह्याला मिळणार्‍या 25 रुग्णवाहिका या 102 क्रमांकाच्या आरोग्य सेवेत दाखल होणार आहेत.