अमरावती, भातकुली तालुक्यात पावसाचा कहर;सूर्यगंगा व पिंगळाई नद्यांना महापूर

0
22

अनेक दुकान व घरांमध्ये पाणी शिरले
मोठ्या प्रमाणात झाले नुकसान

अमरावती-मंगळवारी पहाटे अमरावती शहरसह तालुका व भातकुली तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. अमरावती शहरात 101, बडनेरा क्षेत्रात 130, भातकुलीत 170 मिमी पावसाची नोंद झाली. दोनही तालुक्याच्या गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात 90 ते 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ढगांच्या कडकडाटासह पहाटे तीन वाजतापासून सकाळी 6 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. अमरावती शहरातील राजापेठ, राजकमल, मोची गल्ली, दस्तूर नगर, यशोदा नगर, रुक्मिणी नगर, गाडगे नगर, शेगाव नाका आदी परिसरात पाणी तुंबल्याने तळमजल्यातल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे दुकानदांराचे प्रचंड नुकसान झाले. दुकानातले पाणी दिवसभर उपसण्याचे काम सुरू होते. बडनेरा येथील नवीवस्तीत येणार्‍या बालाजी नगर परिसरालगत असणार्‍या नाल्यातील पाणी थेट नागरी वसाहतीत शिरल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. या परिसरात कंबरभर पाणी साचल्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. या भागातील अनेकांची वाहने पाण्यात बुडाली अनेकांच्या घरात विंचू, साप शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच महापौर चेतन गावंडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, सभागृह नेता तुषार भारतीय यांच्यासह महापालिकेचे बचाव पथक बालाजी नगर परिसरात धडकले. पहाटे साडेतीन वाजल्यापासून या परिसरातील पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिसरातून वाहणार्‍या नाल्याची सफाई केली नसल्यामुळे परिसरात पाणी शिरले. तसेच या भागात रस्त्यांचे बांधकाम झाले नसल्यामुळे हा संपूर्ण परिसर पाण्याखाली आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. भातकुली तालुक्यातल्या भातकुली शहर, पूर्णानगर, आष्टी, आसरा, निंभा, कोल्हापूर या गावांमध्ये 100 ते 125 मिमी पावसाची नोंद झाली. या भागातल्या शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

तलावांची पातळी वाढली
अमरावती शहर आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील वडाळी आणि छत्री या दोन तलावांची पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी अमरावती शहरात आतापर्यंत हवा तसा पाऊस झाला नसल्यामुळे हे दोन्ही तलाव अद्याप पूर्णतः भरले नव्हते. मंगळवारच्या पावसामुळे मात्र दोन्ही तलावांची पातळी वाढली. आणखी मुसळधार पाऊस कोसळला तर हे दोन्ही तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
 राजापेठ भुयारी मार्गात पाणी
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राजापेठ भुयारी मार्गात मुसळधार पावसामुळे पाणी साचले. त्यामुळे राजापेठ ते दस्तूर नगर हा मार्ग बंद झाला. भुयारी मार्गात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे अतिशय गर्दीचा आणि महत्त्वाचा हा मार्ग बंद झाला. मनपाच्या पथकाने भुयारी मार्गातले पाणी पंप लावून बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते.
 सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यातल्या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात अमरावती तालुक्यात 85.6 मिमी, भातकुली तालुक्यात 109.6 मिमी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 102.6 मिमी, चांदूर रेल्वे तालुक्यात 72.4 मिमी, तिवसा तालुक्यात 83.6 मिमी, दर्यापूर तालुक्यात 66.2 मिमी, धामणगाव रेल्वे तालुक्यात 77.8 मिमी पावसाची नोंद मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या 24 तासात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 56.7 मिमी पाऊस झाला आहे.

सूर्यगंगा व पिंगळाई नद्यांना महापूर
तिवसा-गेल्या 48 तासापासून तिवसा तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. यातच मोझरी येथून वाहत जाणारी सूर्यगंगा नदी व तिवस्यावरून जाणारी पिंगळाई नदी या दोन्ही नद्या अक्षरशः ओव्हरफ्लो होऊन वरखेड गावाच्या वेशीपर्यत पोहचल्या होत्या. नदीपात्रातील पुराचे पाणी हे नदीकाठच्या अनेक शेतात व काही प्रमाणात गावात सुद्धा शिरल्याची माहिती आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तिवसा तालुक्यात सर्वत्र सतत पाऊस होत आहे. त्यामुळे सूर्यगंगा नदीला 7 सप्टेंबर रोजी मोठा पूर आला. पावसाने येथील पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली असून सर्वत्रच मर्यादेपेक्षा अधिक जलसाठा झाल्याने या क्षेत्रातील अनेक तलाव, धरणे ही ओव्हरफ्लो होऊन जलाशयाच्या पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. अशातच मोझरी येथील सूर्यगंगा नदीला व तिवसा येथील पिंगळाई नदीला 6 सप्टेंबरच्या रात्रीपासून मोठा पूर आला असून हा पूर समोर 20 किमीपर्यत वरखेड गावावरून वर्धा नदीपात्रात गेला. पुराचे पाणी हे मोठ्या प्रमाणात असल्याने वरखेड येथील नदीपात्राबाहेर या नदीचे पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट गावाच्या काठावर असलेल्या दुकानात, शेतात शिरले. यामुळे काही वेळ नागरिकांनी भीती व्यक्त केली होती. तर नदीकाठच्या अनेक शेतात या पुराचे पाणी शिरल्याने शेतातील पिके जलमय झाली होती.