जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकरी आंदोलनाकडे फिरविली पाठ

0
43

इर्री परिसरातील शेतकऱ्यांत रोष

गोंदिया,ता.9-मागच्या नऊ ऑगस्ट पासून तालुका इर्री येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे हे आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मिळावी म्हणून आंदोलनास बसले आहेत. या दरम्यान मंगळवारी (ता.7)जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकारी येथून जवळच असलेल्या मोरवाही येथे दाखल झाले. परंतु अगदी लागूनच असलेल्या शेतकरी आंदोलनास साधी भेट देण्याचे सौजन्यही या अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी शेतकरी आंदोलनाकडे पाठ तर फिरवली नाही ना? अशी भावना परिसरातील शेतकरी व्यक्त करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांत रोष दिसून येत आहे.
येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांच्या शेतातील झोपडीवर अतिक्रमणाचा ठपका ठेवीत ग्रामपंचायत प्रशासनाने मागच्या मार्च महिन्यात जमीनदोस्त केली. त्यातच घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू उपस्थित अधिकाऱ्यांनी जप्त केल्या.त्यामुळे तब्बल दोन दिवस या शेतकरी कुटुंबाला उपाशीपोटी रहावे लागले. हे विशेष. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मिळावी म्हणून या शेतकऱ्याने जिल्हा प्रशासनाकडे अनेक विनंती अर्ज केले. परंतु अद्यापही प्रशासनाने त्यांना न्याय दिले नाही. शेवटी न्याय मिळत नसल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्याने नऊ ऑगस्ट पासून आपल्या पडक्या झालेल्या जागेवर आपल्या कुटुंबासहित धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनाला महिनाभराचा काळ उलटला तरी अजूनही एकही अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला साधी भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही.दरम्यान मंगळवारी(ता.7) इथून अर्धा किलोमीटर वर असलेल्या मोरवाही येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले,जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, गटविकास अधिकारी खोटेले, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी दाखल झाले, मात्र या सर्वच अधिकाऱ्यांनी अन्यायग्रस्त शेतकरी आंदोलनाला साधी भेट देण्याचे सौजन्य ही दाखवले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात रोष दिसून येत आहे. कदाचित शेतकऱ्यांची या अधिकारी वर्गाला किव तर येत नाही ना?अशी बोलकी प्रतिक्रिया या परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. अधिकारी वर्ग शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्यामुळे कदाचित शेतकरी आत्महत्येची वाट तर पाहत नाही ना? अशी भावना ही अन्यायग्रस्त शेतकर्‍याने व्यक्त केली आहे. सदर आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.