मालवीय वॉर्ड श्रीनगर येथे महिलांनी केले सामूहिक हरतालिका पूजन

0
49

गोंदिया –गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. यादिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो. यंदा 9 सप्टेंबर 2021 गुरुवारी देशभरात हरतालिका साजरी करण्यात आली. वैवाहिक महिलांसोबतच कुमारीका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात. हा व्रत केल्यानं मनासारखा जोडीदार मिळतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे कुमारीका सुद्धा हे व्रत करतात. हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका ‘ असे म्हणतात.
पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलयाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देवून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी या हरतालिका ची आख्यायिका आहे
या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून आंघोळ करतात. आंघोळ केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवून. रांगोली काढून चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करतात. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडतात. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवतात.
अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करतात. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करतात. सर्वप्रथम गनपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. या पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.
पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करतात. दिवसभर कडक उपोषण वा शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून  विसर्जन करतात.