ओबीसी आरक्षणासाठी सहा ठिकाणी भाजपाचा चक्काजाम

0
15

वाशीम–राज्यात सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आले असून, ओबीसी समाजावर हा मोठा अन्याय आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागेस्तोवर निवडणूका घेणार नसल्याचा शब्द देणारे सरकार आपल्या शब्दाला जागले नाही. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एल्गार पुकारला आहे.
या पार्श्‍वभूमिवर भाजपाने आज, 15 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजु पाटील राजे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. जिल्ह्यातील सहाही तालुक्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्ते रोखले. यावेळी पोलीसांना हजारो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी वाशीम शहरातील पुसद नाका परिसरात राजु पाटील राजे, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे व शहराध्यक्ष राहूल तुपसांडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी तासभर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आघाडी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. राज्यात देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वात सरकारने ओबीसी आरक्षण कायम रहावे यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही प्रक्रिया ठप्प पाडली. न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली नाही. ओबीसी समाजाची संख्या निर्धारित करण्यासाठी मागासवर्गीय आयोग गठित केला. परंतु आयोगाला निधी दिला नाही, कर्मचारी दिले नाही. राज्य सरकारने ओबीसी समाजावर केलेल्या या अन्यायाविरोधात भाजपाने एल्गार पुकारला आहे. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले.
वाशीम शहरातील पुसद नाका परिसरात तब्बल तासभर रस्ता रोखून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध नोंदविला. यावेळी जिल्हा महामंत्री नागेश घोपे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळु मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे, शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, अंबादास कालापाड, रामप्रसाद सरनाईक, अनिल ताजणे, नागोराव वाघ, धनंजय रणखांब, धनाजी सारस्कर, गणेश खंडाळकर, शिवशंकर भोयर व आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.