भारतीय लोकशाहीतील सर्वसमावेशकता अधोरेखित करा – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

0
13

कन्याकुमारी ते राजघाट सायकल रॅलीला पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा

वीर पत्नीचा सन्मान; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर दि. 17 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना नागपूर सारख्या मध्यवर्ती शहराने विविध विचारधारा व त्यातील मतभेद अनुभवले. तरीही आमचे ध्येय एकच होते. ते म्हणजे स्वातंत्र्य मिळविणे. या महोत्सवात भारताच्या सर्वसमावेशकतेला मनामनात अधोरेखित करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

16 सप्टेंबर रोजी सकाळी संविधान चौक येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पुढाकाराने आयोजित आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात देशासाठी शहीद होणाऱ्या वीर जवानांच्या वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरिक्षक प्रशांत जांभुळकर, सुभाष चंद्र, संतोष मिश्रा, कमांडंट करुणा राय आदींची उपस्थिती होती.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या इतिहासातील विविध विचार प्रवाहांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. नागपूर सारख्या शहरात विविध विचारधारा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धडपड करीत होत्या. मात्र कोणताही हिंसाचार न घडवता शांतीच्या मार्गाने गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी दिलेल्या शांतीच्या महामंत्राने स्वातंत्र्य प्राप्त झाले. हा महामंत्र महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्यासाठी वापरत होते तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्म परिवर्तनासाठी वापरत होते. देशाच्या स्वातंत्र्य संदर्भात मात्र दोन्ही नेत्यांचे एक मत होते. अनेक विषयांवर मतभेद असले तरी मनभेद नव्हते. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील चर्चा नागपूर-वर्धा शहराने अनुभवल्या आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करताना स्वातंत्र्य काळातील ध्येय, उद्दिष्ट आणि त्यासाठीचे समर्पण त्यासाठी संपूर्ण समाजव्यवस्थेने स्वीकारलेली सर्वसमावेशकता जनतेपुढे आजही मांडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

आजच्या कार्यक्रमात शहीद नरेश उमराव बडोले,  देविदास शहीद ईश्वर नागापुरे, देविदास गुबडे, डी. जी. आडे यांच्या वीर पत्नी श्रीमती प्रमिला नरेश बडोले, श्रीमती अनिता देवी, श्रीमती शांता बाई, श्रीमती रेखा गुबडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

भारताच्या चार दिशेतून सध्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला चारही सायकल रॅली राजघाटावर पोहोचणार आहे. तत्पूर्वी भारत भ्रमण दरम्यान या सायकल रॅलीच्या स्वागतासाठी देशात विविध ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो किलोमीटर मना-मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून ठेवणाऱ्या या सायकल प्रवासाचे साक्षीदार पालकमंत्री झाले होते. त्यांनी कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या हजारो किलोमीटरचे अंतर कापून दाखल झालेल्या 30 सायकलपटूंचे स्वागत केले. त्यांना दिल्लीकडे हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक प्रशांत जांभूळकर यांनी देशभरात सुरू असलेल्या या कार्यक्रमाचे महात्म्य सांगितले. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या सायकल रॅली द्वारे दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन करुणा राय यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष चंद्र यांनी केले. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, लोकप्रिय नाशिक ढोल पथकाचे सादरीकरण करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमासाठी संविधान चौकात जमले होते.