यशवंत ग्राम चिचटोला येथील सिमेंट रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

0
46

**बांधकामांवर बिगर राॅयल्टीच्या रेतीचा वापर

सडक अर्जुनी:(महेंद्र टेंभरे)::–सडक अर्जुनी तालुक्यातील यशवंत ग्राम चिचटोला येथे गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून हनुमान मंदीरा पर्यंत अंदाजे ४००मी. रोडावर सिमेंट रोडाचे बांधकाम सुरू आहे.सदर काम ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असून तालुक्यात एकही रेती घाट लिलाव नसतांनी या कामावर निकृष्ट दर्जाचे चोरट्या मार्गाने बिगर राॅयल्टीची रेती आणून काम करण्यात येत आहे.सिमेंट रोडाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या कामाची चौकशी करून कंत्राटदार व देखरेख करणा-या अधिका-यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सदर सिमेंट रोडाचे बांधकाम भर पावसाळ्यात सुरू असून या कामावर बिगर राॅयल्टीची चोरट्या मार्गाने रेती पहाटे ४ ते सकाळी ८-९ वाजेदरम्यान ट्रॅक्टरने आणून काम करण्यात येत आहे.महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे शासकीय कार्यालयाची वेळ पाहून चोरट्या मार्गाने रेती आणली जाते.भर पावसाळ्यात काम सुरू असून सदर काम पावसाळा संपल्यानंतर करायला पाहिजे होते.पण ग्रामपंचायत प्रशासन व कंत्राटदार शासनाची दिशाभूल करून पाण्याचा लागणारा खर्च वाचविण्यासाठी व अधिका-यांच्या फिरकाव राहत नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम करण्याची संधी मिळते म्हणून हे काम पावसाळ्यात करीत आहेत.तालुक्यात घरकुल बांधकामासाठी गरजुंना योग्य पाठपुरावा करून सुद्धा रेती मिळत नाही. व त्यांना महागड्या भावाने रेती घ्यावी लागते.
सविस्तर असे की, यशवंत ग्राम चिचटोला येथील सिमेंट रोडाचे बांधकाम आटोक्यात आले आहे.या कामाचा कुठलाही प्रकारचा लेखाजोखा ग्रामपंचायत कडे उपलब्ध नाही.नियमाप्रमाणे इस्टीमेट मध्ये दिल्याप्रमाणे संपूर्ण साहित्य कामाचे जागेवर उपलब्ध करून समक्ष अधिका-यांची संमती घ्यावी लागते.तसेच कामाची संपूर्ण माहिती वेळोवेळी ग्रामसचिवांना ठेवावी लागते.पण गावात ८ दिवस काम सुरू असून गावात सरपंच,सचिव कामाचे वेळेवर व काम सुरू असतांनी गैरहजर होते.काम करणा-या मजूरांना विचारले असता सरपंच,सचिव यांचा कामाशी कसलाही संबंध नाही असे बोलले.साठा रजिस्टर,व्हिजिट बुक सुद्धा उपलब्ध नाही.ग्रामपंचायत कुलूप बंद आहे.आणि सदर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत आहे,ते अधिकारी व कंत्राटदार सुद्धा हजर नाहीत.सदर सिमेंट रोडाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असून कामात अनियमितता व कामाची गुणवत्ता खालावली असल्याचे दिसून येते.सिमेंटचा वापर सुद्धा नाहीच्या प्रमाणात करण्यात आला आहे,असे गावातील ग्रामस्थ बोलतात.या रोडाचे बांधकामात प्रथम ६”(इंच) सिमेंट कोड, गिट्टी,रेती ,नाहीच्या प्रमाणात सिमेंटचा वापर केल्यामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.आणि वरचा कोड मात्र सिमेंटचा पालीश देऊन चकीत करण्यात आला आहे.त्यामुळे यशवंत ग्राम चिचटोला येथे लागलेल्या भ्रष्टाचाराचे ग्रहण हटविण्यासाठी या कामाची त्वरीत चौकशी करून भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.