जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करतांना अर्जदार व नेट कॅफे यांना महत्वाच्या सूचना

0
55

गोंदिया,दि.21 : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर
मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या अर्जदारांना शैक्षणिक प्रयोजनार्थ- 12 वी विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम,
सेवा प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून नियुक्ती/पदोन्नती, निवडणूक प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य
संस्थेंतर्गत उमेदवारीसाठी अर्ज व अन्य प्रयोजनार्थ- आरक्षित प्रवर्गातून सदनिका, गाळे वाटप, पेट्रोलपंप, जात वैधता
प्रमाणपत्र लागू केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत लाभासाठी बार्टी, पुणे यांचे
https://bartivalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑगस्ट 2020 पासून नविन ऑनलाईन अर्ज भरणे
व मूळ कागदपत्रे पुरावे अपलोड करणे आवश्यक केलेले आहे. आता निवडणूक व अन्य प्रयोजनार्थसह सर्वच
प्रयोजनाकरीता ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक केलेले आहे. आवेदनपत्राचा नमूना अत्यंत सोप्या भाषेत दिलेला
असल्याने व त्यात जास्त माहिती भरावयाची नसल्याने अर्जदार विशेषत: विद्यार्थी ते स्वत: देखील भरु शकतात व
कागदपत्रे मोबाईलवर स्कॅन करुन अपलोड करु शकतात.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे अपलोड करावी- प्राथमिक पुरावे अंतर्गत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, नमूना 3 व
नमूना 17 चे शपथपत्र, नमूना 15 अ चे शिफारस पत्र (प्राचार्य/कार्यालय प्रमुखाचे), अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी,
पालकाची स्वाक्षरी, दुय्यम पुराव्यामध्ये अर्जदाराचे स्वत:चे जन्म प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक नाही. हे फक्त
निवडणूक प्रयोजनार्थ उमेदवार ज्यांचा जन्म अनुसूचित जातीकरीता 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती भटक्या
जमातीकरीता 21 नोव्हेंबर 1961 व इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गकरीता 13 ऑक्टोंबर 1967 पूर्वी
असल्यासच त्यांचेकरीता लागू राहील. अर्जदाराचा स्वत:चा, वडिलांचा व सख्ये आजोबा यांचेसह मोठे वडील/मोठी
आत्या, चुलत आजोबा यांचा वर्ग 1 ते 4 प्राथमिक शिक्षणाचा शाळा सोडल्याचा दाखला संलग्न करणे आवश्यक आहे.
यामध्ये माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय किंवा वरिष्ठ महाविद्यालयाचा दाखला संलग्न करु नये. याशिवाय
महसूली पुराव्यात वडिलांकडील रक्तनातेवाईकांचे नावे (वडील) आजोबा, पणजोबा यांचे नावे बक्षिसपत्र, इनाम
सनद, मॉर्टगेज, घराची कर आकारणी नोंद (ग्रामपंचायत/नगरपरिषद येथील नोंद) एकाच सर्व्हे नंबरचे अधिकार
अभिलेख पंजी, पी-9,पी-II खसरा पाच वर्षाचा किंवा पी-1, त्याचा रीनबरींग पर्चा व रीनबरींग पर्चात नमूद सर्व्हे
नंबरचा सातबारा सादर करता येईल. जन्म-मृत्यूची कोतवालपंजी एकेरी नावाने नसावी व त्या गाव-शहरातील
मानिव दिनांकापूर्वीचा/लगतचा अधिवास पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
अर्जदारास त्यांचे जातीचे प्रवर्गानुसार अनुसूचित जातीकरीता 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती भटक्या
जमातीकरीता 21 नोव्हेंबर 1961 व इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गकरीता 13 ऑक्टोंबर 1967 ही
मानिव दिनांक निर्धारीत करण्यात आलेली असून त्या त्या प्रवर्गातील अर्जदाराकडे त्यांचे जात प्रवर्गानुसार सदर
मानिव दिनांकापुर्वीचे जात नोंदीचे व अधिवासाचे पुरावे असणे व ते सादर करणे आवश्यक आहे. तसेच तो पुरावा
ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीपर्यंत सहसंबंध दर्शविणारे कुटूंबातील व्यक्तीचे शैक्षणिक/महसूली पुरावा सादर
करणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदाराचे सख्ये कुटूंबियाचे नावे मानिव दिनांकापुर्वीचा अधिवास पुरावा (जसे-
ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद येथील कर आकारणी नोंद नमूना 8/9, 12 ब किंवा 17) गोंदिया जिल्ह्याचे
बाहेरील क्षेत्रातील/जिल्ह्यातील असल्यास संबंधीत क्षेत्रातील सक्षम प्राधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्र प्राप्त करुन
संबंधीत जिल्ह्याचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्जदाराने प्रस्ताव दाखल करावा.
अर्जासोबत सादर वंशावळ फार तोटक असते. त्यामध्ये अर्जदार वडिलांचे, आजोबांचे व पणजोबांचे या सर्वांचे
सख्ये भाऊ बहिणी यांचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. तसेच वंशावळ ही खरी व योग्य असावी. त्यामध्ये नावे
समाविष्ट करतांना कुटूंबातील पुर्वजांचे नावांची सहसंबंधाची माहिती घेऊन योग्यप्रकारे नोंद करावी. एकदा सादर
वंशावळमध्ये नंतर बदल करता येणार नाही. तरी याबाबत विद्यार्थी/संबंधीत अर्जदार व पालक वर्ग यांनी दक्षतापूर्ण
अर्ज भरणे व आवश्यक मूळ कागदपत्रे अपलोड करण्याची व सादर करण्याची कार्यवाही करावी. असे उपायुक्त तथा
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी कळविले आहे.