ओबीसींचा संवैधानिक वाटा ओबीसींनाच देण्यात यावा

0
13

नागपूर- ओबीसींचा संवैधानिक वाटा हा ओबीसींनाच देण्यात यावा. यातून इतरांना तो देऊ नये, असा गांभीर्याचा इशारा आ. नाना पटोले यांनी दिला. ते कामठी तालुक्यातील गादा येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हा महाअधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे होते. तर व्यासपीठावर माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, टेकचंद सावरकर, अभिजीत वंजारी, माजी आ. सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते. पटोले पुढे म्हणाले की, मी या कार्यक्रमात एक ओबीसी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आलो आहे. काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष किंवा इतर संवैधानिक पदे ही ओबीसींच्या संवैधानिक हक्कांसाठी लढण्याकरिता आहेत. या वर्षीपासून ओबीसींचे वसतिगृह सुरू व्हायलाच पाहिजेत. तसेच आता ओबीसींनी खासगीकरणाला विरोध करणे गरजेचे आहे. कारण आरक्षण हे खाजगी उपक्रमाला लागू होत नाही. आम्हा ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि राजकीय असे आरक्षण हवे आहे. ते मिळविण्यासाठी ओबीसींनी डॉ. तायवाडे यांच्या नेतृत्वात संघटित होऊन आपला संघर्ष तीव्र करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. बबनराव तायवाडे यांनी संवैधानिक कलम ३४0 ची पार्श्‍वभूमी विशद करीत ओबीसी आरक्षणाची परीपाठी सांगितली. ओबीसींचे आरक्षण हे संवैधानिक व कायदेशीर आहे. ते संपूर्ण क्षमतेने लागू करणे ही सरकारची जवाबदारी आहे. पण त्यासाठी आम्हा ओबीसींना आंदोलन करावे लागते. संचालन परमेश्‍वर राऊत व मंगेश सातपुते यांनी के ले. तर अनिता ठेंगरे यांनी आभार मानले.  कार्यक्रमात ग्रामीण परिसरातील ओबीसी तसेच नागपूर शहरातील हजारो ओबीसी बांधव उपस्थित होते.