धान खरेदी भ्रष्टाचारात भाजप नेत्यांचाच सहभाग

0
84

भंडारा-जिल्ह्यामधील धान खरेदी केंद्रावरील खरेदीमध्ये गैरव्यवहार असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय मंत्र्याकडे तक्रार केल्याचे सांगून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना बदनाम करण्याच्या हेतूने त्यांचा जाणीवपूर्वक व्यक्तव्य केल्याचे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, कुठलाही धान खरेदी केंद्राशी नाना पटोले यांचा काहीही संबंध नाही. जिल्ह्यातील सहकारी संस्थाधारक हे प्रत्यक्ष केंद्र सरकारच्यावतीने शेतकर्‍यांकडून धान खरेदी करतात. त्यामध्ये राज्य सरकार ही नोडल एजंसीची भूमिका बजवाते. भंडारा-गोंदिया व इतर धान उत्पादक सर्व जिल्ह्यातील धान खरेदित मोठा भष्ट्राचार आहे म्हणून नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष असताना चौकशी लावली. चौकशी अहवालात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार करणार्‍या संस्था संघ आणि भाजप संबंधित असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी केंद्रामार्फत दबाव आणून चौकशी थांबावली. आता त्यांचेच पितळ उघडे पडले.
खासदार सुनील मेंढे हे खासदाराच्या भूमिकेत जनतेला कधीच दिसले नाही. ते सतत ठेकेदारीच्या भानगडीत राहुन स्वहित जोपासण्यात व्यस्त आहेत. खासदार म्हणून अधिकार्‍यांवर दबाव आणने व ठेकेदारी मिळवणे हाच एकमेव उद्योग त्यांचा आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी झटत असलेले नाना पटोले यांना खासदार मेंढे विनाकारण बदनाम करीत आहेत. जिल्हा परिषदेत बीओटी तत्वावर गाळे बांधकाम करण्याचे काम त्यांना न मिळाल्याने ते उलट सुलट आरोप करीत आहेत. सुनील मेंढे स्वत: नगराध्यक्ष होते व खासदार आहेत. त्यांच्या काळात नगर परिषदमध्ये अनेक कामांमध्ये घोटाळे झालेले आहेत. ते उघड होऊ नये म्हणून नाना पटोले यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. यापुढे नगर परिषदेत झालेले सर्व घोटाळे बाहेर काढू, असा इशारा काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव शिशिर वंजारी, गटनेता रमेश पारधी, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, माजी जिल्हाध्यक्ष सागर गणवीर आदी उपस्थित होते.