एक विद्यार्थी, एक वृक्ष योजना राबविण्याची आवश्यकता- विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे

0
34

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूरचा उपक्रम

नागपूर, दि. 22 – पृथ्वीच्या संरक्षणासाठी सर्वांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, तसेच महाविद्यालयीन स्तरावर एक विद्यार्थी, एक वृक्ष योजना राबविण्यास सुरूवात करावी, असे प्रतिपादन सामाजिक वनीकरणाच्या विभागीय वन अधिकारी गीता नन्नावरे यांनी आज येथे केले.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (महाराष्ट्र-गोवा रिजन), पुणेच्या अधिनस्थ असलेल्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूर आणि डॉ. मधुकरराव वासनिक पी. डब्लू.एस. महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी मार्गावरील पी.डब्लू.एस. महाविद्यालयात आयोजित केलेल्या जागतिक वसुंधरा दिन विशेष प्रचार अभियान कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी पी.डब्लू.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील होते. तर मंचावर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, उपप्राचार्य डॉ. नरेंद्र बागडे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरचे प्रभारी सहायक संचालक तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, पी. डब्लू.एस. महाविद्यालयाचे पर्यावरण समन्वयक डॉ. विवेक चव्हाण, पी.डब्लू.एस. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समनव्यक डॉ. सुशांत चिमणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पृथ्वीने दिलेल्या संसाधनाचा गरजेपुरता वापर करण्याचे सांगून गीता नन्नावरे म्हणाल्या की, निसर्गाकडून आपल्याला प्राणवायु, पाणी निःशुल्क मिळत आहे, मात्र निसर्गाला सुध्दा आपल्याकडून काही देणे आवश्यक आहे. त्याकरीता प्रत्येकाने एक वृक्ष लावण्याची आवश्यकता आहे. भावी पिढीला महत्व पटवून देण्यासाठी ही मोहिम विद्यार्थ्यांपासून सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. टाके म्हणाले की, कोरोना माहामारीत ऑक्सीजन अभावी अनेकांना आपले जिव गमवावे लागले आहे. त्यामुळे निसर्गाचे खरे महत्व समजण्याची आवश्यकता आहे. निसर्गाने आपल्याला बरीच संसाधने दिलेली आहे. मात्र अनेक ठिकाणी विज व पाण्याचा अतिप्रमाणात वापर करून निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा गैरवापर केला जातो, तसेच अनेक ठिकाणी वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे निसर्गाचा असमतोल निर्माण होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे प्रत्येकाने एक वृक्ष लावावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. यशवंत पाटील म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी दुस-यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः व आपल्या घरापासून सुरूवात करावी. निसर्गाने दिलेल्या अमर्यादित संसाधनांचा आपण वापर करतो, मात्र निसर्गाच्या संगोपणासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन एक आदर्श नागरीक म्हणून आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोचे सहायक संचालक हंसराज राऊत यांनी जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व सांगून प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्या वृक्षाचे संगोपन करून निसर्गाच्या संरक्षणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.
संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक पाटील यांनी केले. तर आभार डॉ. सुशांत चिमणकर यांनी मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरेंद्र बागडे यांनी वसुंधरा वाचवा या विषयावर लघु नाटिका सादर करून उपस्थितांना निसर्गाचे महत्व पटवून दिले. तसेच राष्ट्रभाषा परिवार या संस्थेने पथनाट्याच्या माध्यमातून जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड, प्लास्टीकचा अतिवापर, ओझोन थराचा प्रश्न, सौर उर्जेचा वापर, पाण्याची बचत यावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.
यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. रांगोळी स्पर्धेच्या परिक्षक म्हणून डॉ. अमृता मासुरकर, प्राध्यापिका अश्विनी गिरडे, चित्रकलाचे परिक्षक म्हणून डॉ. अमोल मेंढे, प्रा. किशोर शेंडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोचे तांत्रिक सहायक तिवारी, संजीवनी निमखेडकर, नरेश गच्छकाय, पी.डब्लू.एस. महाविद्यालयाचे डॉ. कमलाकर तागडे, डॉ. विमल राठोड, सहयोग डॉ. नागसेन लांडगे, प्रा. अमित गजभिये, प्रा. क्रिष्णा दहिकर, दिपक जैस्वाल, शिपाई मेहमुद अली यांनी परिश्रम घेतले.

रांगोळी स्पर्धेतील विजेते विद्यार्थी
प्रथम क्रमांक – प्रणव कांबळे
द्वितीय क्रमांक – सना शेख
तृतीय क्रमांक – सोनाली चव्हाण
प्रोत्साहन – हर्षा फुलझेले, साक्षी पाटील
चित्रकला स्पर्धेतील विजेते विद्यार्थी
प्रथम क्रमांक – अभिषेक पाटील
द्वितीय क्रमांक – रोनीत ढोक
तृतीय क्रमांक – पूजा बगमारे