राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम 25 एप्रिलला

0
29

 गोंदिया,दि.24 : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेअंतर्गत सर्व आंगणवाडी, सर्व शासकीय शाळा/शासकीय अनुदानित शाळा/नगरपालिका, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कुल, गुरुकुल, संस्कार केंद्र, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनी वयोगटानुसार ॲलबेंडाझोल गोळी खाऊ घालणे आहे. ही मोहिम जिल्ह्यासोबतच गोंदिया तालुक्यात सुध्दा राबविण्यात येणार असून सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागासोबतच इतर विभागांचे सुध्दा सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने 22 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय समन्वय समिती पर्वणी पाटील यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समन्वय समितीची सभा घेण्यात आली. सभेला आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग व महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

         ही मोहिम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना आदेशित करुन सदर मोहिम 100 टक्के यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आंगणवाडी सेविका व प्रत्येक शाळेतील एक नोडल शिक्षक यांचे एक दिवशीस प्रशिक्षण 23 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याबाबत आदेशित केले.

         मोहिमेच्या जनजागृतीकरीता माता बैठका घेणे. प्रत्येक गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे तसेच ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत गावात दवंडी व माईकींगद्वारे जनजागृती तसेच शहरामध्ये सीटी केबल व सिनेमागृहामध्ये जाहिरातीद्वारे व्यापक प्रसिध्दी व जनजागृती, प्रतिष्ठित नागरिक सरपंच, पोलीस पाटील, वरिष्ठ नागरिक, सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी प्रत्यक्षात सहभागी होणे, खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांमार्फत बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या पालकांना मोहिमेची माहिती देणे. तालुक्यातील सर्व शहरी/ग्रामीण भागातील मुला-मुलींना 100 टक्के जंतनाशकाची गोळी खाऊ घालणे व 1 ते 19 वर्ष वयोगटातील एकही लाभार्थी मोहिमेपासून वंचित राहणार नाही याकरीता 25 एप्रिल 2022 रोजी सर्व आंगणवाडी, सर्व शाळा, सर्व महाविद्यालयात मुला-मुलींची उपस्थिती 100 टक्के राहील याकरीता शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांना सूचित केले.

         तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी सदर मोहिमेबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी सदर मोहिम यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.