५८५ वीज चोरी करणार्‍यांवर महावितरणची कारवाई

0
57

 गोंदिया- अनधिकृतपणे वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज वापरणार्‍या वीज चोरांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली आहे. गोंदिया परिमंडळात ५८५ वीज चोरांवर कारवाई करून जोरदार दणका दिला आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून विविध ठिकाणी कारवाई केल्याने जिल्ह्यातील यंत्रणेवर असलेला दाब कमी करण्यात यश आले असल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आली आहे.
यात गोंदिया तालुक्यातील २३0, देवरी तालुक्यातील २१५, भंडारा तालुक्यातील ५५ तर साकोली तालुक्यातील ८५ अशा एकूण ५८५ अनधिकृतपणे वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज वापरणार्‍या वीज चोरांच्या विरोधात महावितरणतर्फे कारवाई करण्यात आली.
परिमंडळात अनेक वीज ग्राहक अनधिकृत वीज वापर करीत असल्याने विद्यमान यंत्रणेवरील दबाव वाढल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महावितरणकडून कठोर कारवाई करण्यात आली. वीज चोरांच्या विरोधात कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. यामुळे यंत्रणेवर पडणारा अतीरिक्त त्राण कमी होण्यास मदत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या गोंदिया परिमंडळातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सर्व फिडरवर ही मोहीम राबवून यंत्रणेवरील असलेला अतीरिक्त दाब कमी करण्यात येणार आहे.विजचोरी अजामीनपात्र तसेच दखलपात्र गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना कठोर शिक्षा झाल्याच्या घटना यापूर्वी राज्यात घडल्या आहेत. याकडे महावितरणने वीज ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

जिल्ह्यातील १0४ जिल्हा परिषद शाळेंचा खंडीत वीजपुरवठा पूर्ववत
गोंदिया : वीज बिल थकल्याने तात्पुरता खंडित करण्यात आलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकूण १0४ जिल्हा परिषद शाळेंचा वीजपुरवठा रविवारी पूर्ववत करण्यात आलेले आहे. महावितरणकडून विजेचे वितरण करताना वापरलेल्या विजेचे बिल न भरणार्‍या सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. याचाच भाग म्हणून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील महावितरणची विजजोडणी असलेल्या १0४ जिल्हा परिषद शाळेंचा वीज पुरवठा ५ लाख ९७ हजार थकबाकीसाठी तात्पुरता खंडित करण्यात आला होता. परंतु, शासनस्तरावर वीज बिलाबाबत झालेल्या निर्णयानंतर महावितरण मुख्य कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत गोंदिया व भंडारा जिल्हातील तात्पुरता खंडित करण्यात आलेल्या १0४ जिल्हा परिषद शाळेंचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याची माहिती महावितरणद्वारे देण्यात आली आहे.