आमच्या पिढीसाठी जिल्हा परिषद नेतृत्व उभारणारी शाळा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

0
10

नागपूर, दि. 01 :  सहकार, स्थानिक प्रश्नांवर कायदे व गावागावातील नागरिकांशी थेट संपर्काची यंत्रणा म्हणजे जिल्हा परिषद. त्यामुळे आमच्या पिढीसाठी जिल्हा परिषद ही नेतृत्व उभारणारी शाळा आहे, ही यंत्रणा आणखी लोकाभिमुख करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुणे जिल्हा परिषदेतून ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. तत्पूर्वी आजी-माजी सदस्यांसोबत एका शानदार सोहळ्याचे आयोजन नागपूर जिल्हा परिषदेत करण्यात आले होते. त्या वेळी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणाने जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण  योगदान दिले असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, समाजकल्याण उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह माजी अध्यक्षा संध्याताई गोतमारे, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, शरद डोणेकर, सभापती नेमावली माटे, सभापती उज्वला बोढारे, प्रकल्प अधिकारी विवेक इलमे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नागपूर जिल्हा परिषदेमध्ये बाबासाहेब केदार, रणजित देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे मंत्री म्हणून त्यांनी आपली प्रशासकीय छाप राज्याच्या कारभारावर पाडली. मात्र त्यांचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेत झाले होते.

जिल्हा परिषद स्थानिक प्रश्‍नांची जाणीव करून देते. राज्याच्या तुलनेत प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे असतात. प्रत्येक जिल्ह्याचा इतिहास, भूगोल वेगळा असतो. अशावेळी स्थानिक नागरिकांना फायदा होईल, अशा पद्धतीने कायद्याची बांधणी करणे गरजेचे असते. बाबासाहेब केदार यांनी फाईलवर केलेली टिपणी, मुद्याचे महत्व, आणखी घट्ट करायचे तर रणजीतबाबू यांनी स्थानिक प्रश्नांसाठी कडवेपणा घेऊन लढण्याची परंपरा निर्माण केली, असे अनेक नेते जिल्ह्यात होऊन गेले. ज्यांनी या जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्रशिक्षण घेऊन पुढे राज्यस्तरावर कर्तृत्वाची अमिट छाप उमटवली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा परिषदेचे महत्व अधोरेखित होते असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी देखील संबोधित केले. वेगवेगळ्या योजना स्थानिक स्तरावर आखण्याचे स्वातंत्र्य जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर दिले आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या ठिकाणी होऊ शकते. एखाद्या संस्थेचे साठ वर्षातच मूल्यमापन करता येणार नाही. मात्र राजकीय व्यासपीठावर सामाजिक व सार्वजनिक प्रश्नांची जान उत्तमपणे होण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरते असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून जिल्हापरिषदेच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा आढावा मांडला.

सूत्रसंचालन उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांनी केले. आभार प्रदर्शन अतिरिका मुकाअ कमलकिशोर फुटाने यांनी केले

000