खासदारांनी घेतला रेल्वे विभागाचा आढावा

0
24

गोंदिया-नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील रेल्वे संबंधी प्रमुख समस्यांच्या संदर्भात २ मे रोजी आढावा बैठक घेतली.
बैठकीत गोंदिया शहरातील रेल्वेमार्गावर सुरू असलेल्या पूल निर्मितीच्या कामात होत असलेली दिरंगाई दूर करून काम लवकर करण्याचे निर्देश दिले. हे काम अधिक गतीने व चांगल्या दर्जाचे व्हावे, असे खासदारांनी सांगितले. पूलनिर्मिती करताना जमीन अधिग्रहणाचा विषय अडचणीचा ठरत आहे. यावेळी खासदारांनी गोंदिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून हा प्रश्न तत्काळ निकाली काढून द्यावा असे आदेश दिले. तिसर्‍या रेल्वे लाईनच्या कामाची माहिती जाणून घेण्यात आली. गोंदिया आणि भंडारा रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याच्या संदर्भात अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेत या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. काही नवीन गाड्यांच्या थांबा संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सकारात्मकता दर्शवित लवकरच नवीन थांबे दिले जातील असे सांगितले.
गोंदिया येथील व्यवसायिक गाळे गेल्या दहा वर्षांपासून योग्य किंमत येत नसल्याने पडून आहेत. या जागेचा वेगळ्या कामासाठी उपयोग करता येईल का यादृष्टीने पर्याय शोधावा, असे खासदार यांनी सांगितले. यावेळी सोबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उत्पल, कर्मशिअल मॅनेजर विकास कश्यप, मुख्य अभियंता त्रिपाठी सर, गजेंद्रजी फुंडे, सेवकभाऊ कारेमोरे, जसपाल सिंग चावला आदी उपस्थित होते.