जिल्हा परिषद प्रशासकीय बदल्यात घोळ,नियमांना तिलांजली

0
249
गोंदिया,दि.05. जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचा कार्यक्रम सामान्य प्रशासन विभागाने घोषित केला आहे. जिल्हा परिषदेत 10 मे रोजी सत्ता स्थापन होणार असून 5 ते 15 मे दरम्यान बदल्या करण्यास सुुरुवात झाली आहे. दरम्यान आज 5 मे रोजी झालेल्या बदल्यात विस्तार अधिकारी सांख्यिकी मध्ये प्रशासकीय बदली करतांना मुख्यालय बदलण्याची आवश्यकता असताना व आदिवासी भागातील रिक्त पदास प्रथम प्राधान्य देण्याची गरज असताना त्यांस फाटा देत प्रशासकीय बदली प्रक्रिया करण्यात आल्याची ओरड सुरू झाली आहे.विस्तार अधिकारी सांख्यिकिमध्ये 2 प्रशासकीय बदल्या होत्या.यामध्ये आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या देवरी पंचायत समितीमध्ये रिक्त जागा असताना आधी त्याठिकाणची जागा भरावयास हवे होते,मात्र तसे न करता जिल्हा परिषद प्रशासकांनी मुख्यालयातच विभाग बदल केले.त्यातच विनंतीअर्ज केलेल्यांनाही संधी देण्यात आली नाही,जेव्हा की विनंतीमध्ये शासकीय निधी खर्च होत नाही,त्यामुळे सुध्दा अनेकांनी नाराजी व्यक्त करीत पूर्ण बदली प्रकियाच घोळमय करुन नियमांना तिलांजली दिल्याचे बोलले जाऊ लागले आहे.हे विस्तार अधिकारी सांख्यिकीसाठी नव्हे तर वरिष्ठ सहाय्यक पदापासून सर्वच पदाच्या बदल्यामध्ये असा प्रकार होत असल्याने कर्मचार्यामध्ये नाराजी दिसून येत आहे.
कक्ष अधिकारीचे रिक्त असलेल्या गोंदिया पंचायत समितीतील पद यावेळी भरण्यात आले आहे.वरिष्ठ सहाय्यकाच्या जागा भरतांना बदली न करताच कार्यशाळा आटोपती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.प्रशासकीय बदली पात्र कर्मचार्यांची स्वाक्षरी उपस्थिती रजिस्टवरवर घेऊन कार्यशाळेतील बदली प्रकियाच बंद करण्यात आली. जेव्हा की अनेक ठिकाणी जागा रिक्त असताना व कर्मचारी जाण्यास इच्छुक असतानाही त्यांना का संधी देण्यात आली नाही,अशा चर्चांना जिल्हा परिषद वर्तुळात सुरवात झाली आहे.

राज्य शासनाच्या 15 मे 2014 च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेत कार्यरत गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या 5 ते 15 मे या कालावधीत करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गट क आणि ड मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सामान्य प्रशासन ,वित्त विभाग,कृषी विभाग,लघु पाटबंधारे,बांधकाम विभागाची  कार्यशाळा आज ५ मे रोजी होत आहेत.तर   पंचायत विभाग 6 मे रोजी सकाळी 11 ते 2, महिला बालकल्याण विभाग 6 मे रोजी 3 ते 3.30, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग 6 मे रोजी 3.30 ते 4, पशुसंवर्धन विभाग 6 मे रोजी चार ते 4.30, शिक्षण विभाग (प्राथ.) 6 मे रोजी दुपारी 4.30 ते 6 आणि आरोग्य विभागाची कार्यशाळा 9 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 1२ वाजतापर्यंत घेण्यात येणार आहे.