– वनविभाग व वन अधिकार्यांना आवाहन
– उपोषणकर्त्यांची घेतली भेट
अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे): आपल्या न्याय व हक्क मागण्यांना घेऊन सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसंघ यांनी वनहक्क धारकाच्या न्याय मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाची माहिती मिळताच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपोषण मंडपास भेट देत उपोषणकर्त्यांच्या मागण्या ऐकुन घेतल्या. वनविभागाने वनहक्क धारकांच्या हक्काावर गदा आणू नये, अन्यथा आदिवासी समाज पेटला तर सावरणे कठीण होईल, असा इशारा वनविभाग व अधिकार्यांना दिला आहे.
यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यामध्ये वनहक्क कायदा २००६ अन्वये गठीत ग्रामसभा परसटोलाचे वनहक्क कायद्याची पायमल्ली करीत तेंदुपाने वाहतुक करीत असताना अवैधरीत्या अडवणुक करून जप्त केलेल्या कारवाईचे लेखी दस्तावेज वनविभागाने ग्रामसभा परसटोलाला पुरवण्यात यावे. वनहक्क पासुन वंचित ठेवुन अन्याय व अत्याचार आणि मानसिक त्रास देणार्या अधिकार्यावर गुन्हे दाखल करावे. जप्तीवाहन वनविभागाने ग्रामसभेत सुपूर्द करावा. नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी वनविभागाचे प्रधान सचिव नायकवडे, उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून उपोषणकर्त्यांच्या मागण्या पुर्ण करावे तसेच उपोषणस्थळी प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी राऊत यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याच्या सुचना केल्या. याबाबत विशेष चौकशी केली असता, ग्राम संघाला वनहक्क कायदा २००६ अन्वये सामुहीक वनहक्क प्राप्त असुन त्याअंतर्गत तेंदुपाने संकलन करण्याचा अधिकार ग्रामसंघाला प्राप्त असताना वन अधिकारी यांनी खाजगी कंत्राटदाराच्या मदतीने ग्रामसंघाचा तेंदुपाने वाहन अडवून ताब्यात घेतला व चोरीची बनावट केस तयार केली. विशेष म्हणजे ज्या वाहन क्रमांक एमएच ४० सीडी १२७५ वनविभागाने जब्त केला त्यातील तेंदुपाने पंचनामा न करता गायब करण्याचा प्रताप वनविभागाने केला. अशा अधिकार्यावर कार्यवाही करावी, यासाठी १० गावातील आदिवासी समाज उपोषण करीत असुन त्यापैकी तीन उपोषणकर्त्यांची स्थिती गंभीर आहे. तरी याबाबत त्वरीत तोडगा काढावा व दोषींवर कार्यवाही करावी असे आव्हान माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, नवेगावचे उपसरपंच रघुनाथ लांजेवार व उपोषणकर्ते उपस्थित होते.