वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

0
21

गडचिरोली,दि १४ जून- शेतावर काम करत असताना एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे मंगळवारी घडली. देविदास कामडी रा. हळदा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी वाघाने हळदा येथील एका मजुरावर हल्ला करून ठार केले होते. २ दिवसात वाघाने दोघांची शिकार केल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

रविवारी हळदा येथील राजेंद्र कामडी जंगलात कुंपणासाठी लागणारे काटे तोडण्यासाठी गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले यामध्ये राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगळवारी शेतावर काम करत असताना हळदा गावातीलच देविदास कामडी (४८) यांच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. २ दिवसात हळदा येथे दोघांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झाले असून तात्काळ ‘त्या’ वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हळदा व गावपरिसरातील नागरिकांनी दिला आहे. तसेच कामडी कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी मुल तालुक्यातील चिंचाळा येथील घटना

मूल तालुक्यातील चिंचाळा येथे वाघाने मंगळवारी बैलावर हल्ला केला. मात्र हा हल्ला शूर बैलांनी वाघाला हुसकावणे देत परतवून लावला व जखमी अवस्थेत घरी पोहोचला. गुराख्यांनी ही बातमी गावात सांगताच बैलाला पाहायला गावात तोबा गर्दी उसळली. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता चे दरम्यान घडली.
चिचाळा येथील संतोष लेनगुरे यांच्या मालकीचा हा बैल असून, दुपारी चरण्यासाठी व पाणी पिण्यासाठी नवीन तळ्याजवळ गेला. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने या बैलावर हल्ला केला. मात्र बैलानेही तेवढ्याच ताकदीने आपल्या शिंगाचा वापर करीत वाघाला परतवून लावले. या घटनेत बैलाचे मानेवर जबर जखम झाली आहे. जखमी अवस्थेत बैल घरी परतल्यानंतर बैलाच्या शौर्याचे कौतुक केले जात आहे.