शासकीय यंत्रणांनी गुणात्मक काम करण्यावर भर द्यावा- पालक सचिव श्याम तागडे

0
42
  • विकास कामांचा आढावा

        गोंदिया,दि.27 : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. राज्याच्या अतिपूर्वेकडे वसलेल्या या जिल्ह्यात काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. यंत्रणांनी केवळ भौतिक उद्दिष्टपूर्तीसाठी काम न करता गुणात्मक काम करण्यावर भर द्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तथा पालक सचिव गोंदिया जिल्हा श्याम तागडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

        जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपवनसंरक्षक कुलराज सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत पालक सचिवांनी विविध विभागाचा आढावा घेतला.

        अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क दावे प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देऊन हा विषय मार्गी लावावा असे ते म्हणाले. घरकुल योजनेबाबत बोलताना तागडे म्हणाले की, गरजू व वंचित व्यक्तीला घरकुलाचा लाभ प्राधान्याने मिळायला हवा. ग्रामपंचायत स्तरावर पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देतांना भेदभाव होत असल्याच्या तक्रारी असून याबाबत तपासणी करून घ्यावी असे त्यांनी सुचविले.

         जिल्ह्यात कोविड स्थिती नियंत्रणात असली तरी दक्षता घेण्यात यावी असे सांगून श्री. तागडे म्हणाले की, लसीकरणाला गती देण्यात यावी. जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १० लाख ७४ हजार २०९, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ७३ हजार २९७, बूस्टर डोस घेणाऱ्याची संख्या २७ हजार ४७६ एवढी आहे. ‘हर घर दस्तक’ या अभियानातून प्रत्येक लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. पावसाळ्यात साथरोग वाढण्याची शक्यता असून या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

         खरीप व रब्बी हंगाम सन २०२१-२२ मध्ये ५७ लाख २८ हजार ८३४ क्विंटल धान खरेदी करण्यात आला असून त्यापैकी ४१ लाख १७ हजार ६६४ क्विंटल धानाची भरडाई झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा नियोजन सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उपयोजना ता तिन्ही मिळून मागील आर्थिक वर्षात २५४ कोटींचा नियतव्यय मंजूर होता. तो शंभर टक्के खर्ची पडला असल्याचे नियोजन विभागाने सांगितले. गोंदिया शहरातील पाणी पुरवठा योजना १९७८ ची असून अमृत योजनेत नवीन पाणी पुरवठा योजना घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

         या बैठकीत घरकुल योजना, पाणी पुरवठा योजना, कोविड, धान खरेदी, जिल्हा नियोजन, नगर विकास, विद्युत विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन या सह विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या विस्तृत माहितीचे सादरीकरण अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.

 गृहभेट उपक्रमाचे कौतूक
शासकीय योजनांची माहिती नसलेल्या दुर्गम भागातील वृद्ध तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना ‘गृहभेट आपुलकीची’ या उपक्रमाद्वारे महसूल विभाग स्वतः अर्ज भरून देऊन लाभ देतो. हा उपक्रम नाविन्यपूर्ण असून यात आतापर्यंत ३२८० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमाचे पालक सचिव श्याम तागडे यांनी कौतूक केले. अन्य जिल्ह्यात हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.