साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाला अटक

0
14

भंडारा दि.4-: मातंग समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्या अनुषंगाने २४ कोटी ६९ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी महामंडळाच्या भंडारा जिल्हा कार्यालयातील व्यवस्थापक प्रताप पवार याला बुधवारी ४ वाजताच्या सुमारास गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी नागपूर येथून अटक केली.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या राज्यभरातील अनेक जिल्हा कार्यालयात जवळपास दीडशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला होता. मातंग समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज देणे तसेच इतर योजनांतील हा गैरव्यवहार करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडे सोपविण्यात आला.
या घोटाळ्याचे तार महामंडळाच्या भंडारा कार्यालयापर्यत जुळलेले असून या कार्यालयात २४ कोटी ६९ लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. त्यामुळे भंडारा जिल्हा व्यवस्थापक प्रताप पवार यांच्याविरुध्द जून २0१५ मध्ये भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसानंतर पवार यांना निलंबित करण्यात आले होते.