आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
8
  • मान्सून पुर्वतयारी आढावा बैठक

      गोंदिया, दि.23 : पावसाळा सुरु होण्यास खूप कमी कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे आवश्यक आहे. आपत्ती ही कधीही सांगून येत नाही. पावसाळ्याच्या दिवसात अचानक पूर येणे, धरण फुटणे, रस्ता वाहून जाणे, गाव पाण्याखाली येणे अशा आपत्ती ओढवतात. त्यामुळे आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

       जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज मान्सून पुर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

        जिल्ह्यातील जुने रस्ते, इमारत, पूल, शासकीय इमारत, शाळा व महाविद्यालय इत्यादींचे संबंधित यंत्रणेने संरचना तपासणी (स्ट्रक्चरल ऑडीट) करुन वापरण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मान्सून कालावधीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करुन तो चोवीस तास कार्यरत राहील याची खात्री करावी असे ते म्हणाले.

        गोंदिया जिल्ह्यात 96 गावे पूरप्रवण असून या गावात विशेष उपाययोजना असलेला सुक्ष्म आराखडा तयार करावा. या गावांसाठी पर्यायी मार्गांची यादी तयार करावी. त्याचप्रमाणे पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी तात्काळ सादर करावी. मान्सून तसेच आपत्तीच्या वेळेस कार्य प्रणालीची कार्यपध्दती अद्ययावत करावी असे त्यांनी सांगितले.

        1 जून पासून तालुका निहाय नियंत्रण कक्ष स्थापन करुन नियंत्रण कक्षात पूर्ण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. त्याचप्रमाणे नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करण्यात यावी. अनुभवी पोहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्ययावत करण्यात यावी. या यादीत महसूल व पोलीस विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा. कार्यप्रणालीची प्रमाणित कार्यपध्दती (एसओपी) अद्ययावत करुन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

        धरणाचे पाणी सोडतांना गावकऱ्यांना पूर्व सूचना देण्यात यावी. त्यासाठी दवंडी, सोशल मिडिया आदीचा वापर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रात सुरक्षीत निवारा, समाज भवन, शाळा, मंगल कार्यालय, लॉन, मोठ्या इमारती इत्यादींची ओळख करुन त्या आरक्षीत करण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी. मान्सून कालावधीत विविध जलाशय, धरण या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

        नाल्यामधील गाळ काढणे, सफाई व स्च्छता तातडीने करुन घ्यावी. नदी, नाल्याच्या काठावर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देण्यात यावी. जिल्ह्यात वैनगंगा व बाघ या महत्वाच्या नद्या असून या ठिकाणी संदेशवहन यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नेमून दिलेली जबाबदारी प्रत्येक विभागाने पार पाडून मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी नियमीत संपर्क ठेवावा असे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घ्यावी. सर्व यंत्रणांनी पूरपरिस्थिती व आपत्तीच्या काळात समन्वय ठेवून काम करावे, तसेच दिलेल्या जबाबदारीचे गांभीर्याने पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

       पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने बाधितांसाठी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य व औषधसाठा आदी सामुग्रींची व्यवस्था आधीच करुन ठेवावी. पूर परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत होतो, अशावेळी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने प्रभावी नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.

        जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित गावे तसेच बचाव पथकांसाठी रबर बोट, फायबर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, OBM मशिन, सॅटेलाईट फोन, टॉर्च, अस्का लाईट, हेल्मेट आदी विविध साधने संदर्भात पुर्वतयारी आताच करुन ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत सादरीकरण केले.