सिव्हील लाईनच्या बोडीचे सौंदर्यीकरण

0
9

गोंदिया दि.14: अनेक वर्षांपूर्वी सिव्हील लाईनच्या सौंदर्यात भर घालणार्‍या बोडीची अवस्था आता नकोशी झाली आहे. तळ्याभर साचलेले शेवाळ, कचरा, काठावर झालेले अतिक्रमण हे सध्याचे या बोडीचे चित्र आहे. मात्र आता हे चित्र बदलविण्यासाठी नगर परिषद पुढाकार घेणार आहे.
प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक अशोक इंगळे, नगरसेविका भावना कदम, राहुल यादव, सुनीता हेमने (तरोणे) यांनी बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष व न.प. प्रशासनासोबत चर्चा केली. त्यानुसार विविध कामांसाठी अंदाजे सव्वा कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज असून येणार्‍या काही दिवसात या कामाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष कशिश जयस्वाल यांनी दिली.
नगरसेवकांच्या मागणीनुसार या बोडीच्या चारही बाजूंनी नागरिकांना पायी फिरता यावे यासाठी खास रस्ता बनविण्यात यावा, चारही बाजूंनी तीन मीटरच्या पायर्‍या, पाण्यात मध्यभागी एका टापूची निर्मिती करून तिथे जाण्यासाठी सिमेंट क्राँक्रिटचा अँप्रोच रोड, बोडीच्या चारही बाजूने अँप्रोच रोडवर बसण्यासाठी खुच्र्या, बोडी परिसरात वृक्षारोपण, रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी पुरेशा प्रमाणात लाईटची व्यवस्था, तसेच राहिलेल्या कंपाऊंड वॉलचे बांधकाम पूर्ण करावे आणि बोडीतील घाण साफ करून स्वच्छ करावी अशा मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.