हिंसक प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून आवश्यक उपाययोजना करा : माजी मंत्री राजकुमार बडोले

0
22

अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यात लगतच्या परिसरातील तिडका, जांभळी, येलोडी, येरंडी/दर्रे, जब्बारखेडा, झाशीनगर या भागात जंगली हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. तर अरुणनगर, गौरनगर, खामखुर्रा, कोरंभी या गावांमध्ये मानवी रक्ताची चटक लागलेल्या वाघाने प्रचंड दहशत पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हत्त्यांच्या कळपाने एका शेतकऱ्याला पायी तुडविले आहे. तर नरभक्षक वाघाने दोन शेतकऱ्याना चिरडले आहे. या हिंसक प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून उपाययोजना करावेत, अशी मागणी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी या परिसरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह वने, सांस्कृतिक कार्य तथा गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत माजी मंत्री बडोले म्हणाले, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील लगतच्या परिसरात वाघ, हत्ती यासारख्या हिंसक प्राण्यांचा वावर असल्यामुळे मागील महिन्यात २० सप्टेंबर रोजी अरुणनगर येथील बिपिन मंडल यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज ०४ ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळच्या वेळी हत्तीचा कळप हाकण्यास गेलेल्या तिडका येथील सुरेंद्र कळहीबाग यांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झालेला आहे.

यापूर्वी परिसरात मागील काही काळात १२ ते १३ व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर आता हत्तीच्या कडपाने जीवित व्यक्ती व शेतपिकाचे फार नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी केली आहे. या बाबींची दखल घेत वने, सांस्कृतिक कार्य तथा गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हत्तीच्या कळपामुळे घरांची झालेली नुकसानबाबत लवकरच मोबदला देण्याबाबत, नवीन शासकीय परिपत्रक जारी करण्याच्या सूचना व शेतांचे संरक्षण करण्यासाठी कुंपण करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचे आश्वासन तसेच वाघ, हत्तीच्या विषयाबाबत वनविभागाला त्वरित आदेश देत आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

या वेळी शिष्टमंडळात माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्यासह भाजप जिल्हा महामंत्री तथा गोंदिया जिल्हा परिषद गट नेते लायकराम भेंडारकर, भाजप अर्जुनी-मोर तालुका महामंत्री लैलेश्वर शिवणकर, राजहंस ढोके, परदेशी कचलामे, बनवारी सोनकलंगी, कमल मिरी, संतोष जुगनाके, मेघनाथ सोनवणे, सुरज रक्षा यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.