धान खरेदी केंद्रावर नोंदणी साठी वयोवृद्ध व आजारी शेतकऱ्यांना सवलत द्या – माजी खासदार शिशुपाल पटले

0
45

मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा सचिवांची घेतली भेट
गर्दी कमी करण्यासाठी ग्रा.पं.स्तरावर नोंदणीची व्यवस्था करण्याची मागणी
भंडारा,दि.15 – भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील नोंदणीच्या अटीत शिथिलता देऊन वयोवृद्ध व आजारी शेतकऱ्यांसाठी त्यांचे घरी जाऊन नोंदणीची व्यवस्था करावी,धान खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नोंदणीची व्यवस्था करावी ह्या मागणीसाठी किसान मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले यांनी दि.१४/१०/२०२२ ला मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव मा. विजय वाघमारे यांची भेट घेतली.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात बऱ्याच धान खरेदी संस्था डिफॉल्ट झाल्यामुळे मोजक्याच धान खरेदी केंद्रांना नोंदणीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यानी परवानगी दिलेली आहे.खरेदी संस्थाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर केंद्रावर रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागतो.अनेक शेतकरी वयोवृद्ध व आजारपणामुळे खरेदी केंद्रावर पोहचू शकत नाही.असे शेतकरी धान विक्री पासून वंचित राहू नये म्हणून त्यांचे घरी जाऊन नोंदणीची व्यवस्था करण्यात यावी तसेच धान खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नोंदणीची व्यवस्था करावी अशी मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिवांकडे केली आहे.