खडसेंची ‘वाय प्लस’ सुरक्षा काढली:पोलिस ठाण्यामध्ये आंदोलन सुरू करताच निर्णय

0
32

जळगाव-जिल्हा दूध संघातील गायब झालेल्या लोणी आणि दूध पावडर संदर्भात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात आंदोलन सुरू करताच त्यांना असलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. गुप्तचर सेवा विभागाकडून (इंटेलिजन्ट सर्व्हिस डिपार्टमेंट) तसे पत्र आल्यामुळे ही सुरक्षा काढण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदावर एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आहेत.

भाजपचे आमदार आणि काही काळ दूध संघाच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या मंगेश चव्हाण यांनी ११ ऑक्टोबरला पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन एक निवेदन दिले होते. त्यात दूध संघातून १४ टन लोणी आणि नऊ टन दूध पावडरचा परस्पर विक्री करून घोटाळा करण्यात आल्याचा आणि त्याचे सूत्रधार संघाच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे निवेदनच प्रथम माहिती अहवाल म्हणून दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली होती. त्यानंतर लगेचच १२ तारखेला मंदाकिनी खडसे आणि कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन तीन कर्मचाऱ्यांविरूद्ध या मालाच्या अपहाराची फिर्याद नोंदवण्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणी आधीच चौकशी सुरू आहे, असे सांगून पोलिसांनी त्यांचा जवाब नोंदवला. १३ तारखेला स्वत: एकनाथ खडसे शहर पोलिस ठाण्यात गेले आणि जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशन सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक लिमये, काही वेळ संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे आणि काही वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीही होते.

पोलिसांवर केले आरोप या आंदोलनाच्या वेळी एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा आणि पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले.

रात्रीतूनच काढली सुरक्षा : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एकनाथ खडसे यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली.

कशासाठी हवी सुरक्षा? मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांची सुरक्षा काढण्याच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांना कशासाठी हवी सुरक्षा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.