वाळूमाफीयांकडून तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न

0
37
file photo

अकोला-वाळू व गौणखनिजांच्या चोरी प्रकरणांत अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील व त्यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी वाळूमाफीयांनी शासकीय कामात अडथळा आणण्यासह तहसीलदार व पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. पथकाला धक्काबुक्कीदेखील करण्यात आली. या प्रकरणी अकोट फाइल पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला-अकोट मार्गावर उगवा गावाजवळ मोर्णा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील पाटील यांना मिळाली. तहसीलदारांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चार ते पाच मजूर नदी पात्रातून वाळू भरत होते. पथकाकडून त्यांना मनाई करण्यात आली. ट्रॅक्टरचा चालक व मालक निखील सुनील सरदार व आशीष सुनील सरदार, रा. उगवा यांनी ट्रॅक्टर नदीपात्रातून भरधाव वेगात रस्त्यावर आणला. वाहन थांबवण्याच्या सूचना दिल्यावर तहसीलदार पाटील व त्यांच्या पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. तहसीलदार पाटील व महसूल सहायक संजय तिवारी यांनी कठडे पकडून धावत्या ट्रॅक्टरमध्ये प्रवेश केला. यावेळी तहसीलदारांनी गंभीर कारवाईचा इशारा दिल्यावर आरोपींनी ट्रॅक्टर थांबवला. चार ते पाच मजूर घटनास्थळावरून पसार झाले. ट्रॅक्टर पुन्हा घटनास्थळावर नेण्यास सांगितल्यावर आरोपींनी अधिकाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की केली. आरोपींचे वडील सुनील पांडुरंग सरदार व आई सुनीता सुनील सरदार यांनी शासकीय कामात अडथळा आणून ट्रॅक्टर जप्त करण्यास मज्जाव केला. या प्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून निखील सुनील सरदार, आशीष सुनील सरदार, सुनीता सुनील सरदार, सुनील पांडुरंग सरदार व अन्य चार अनोळखी अशा एकूण आठ जणांविरूद्ध भादंवि कलम ३५४, ३७९, २७९, ३३७, ५०४, ५०६, १८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.